बारामती Sharad Pawar in Baramati : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना बारामती ॲग्रो कंपनी संदर्भात नोटीस बजावण्यात आलीय. या प्रश्नावर शरद पवारांनी एका वाक्यात उत्तर दिलंय. मी कारवाईबाबत बोलणार नाही असं म्हणत त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय. मी त्यावर उत्तर देऊ इच्छित नाही असं स्पष्ट मतही शरद पवार यांनी व्यक्त केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शरद पवारांचा बोलण्यास नकार : रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. त्यामुळे शरद पवार हे या कारवाईच्या संदर्भात कठोर भूमिका घेतील असं दिसत होतं. परंतु, तसं न करता त्यांनी यावर न बोलणं पसंत केलं आहे. शरद पवार हे यावर काय भूमिका घेतात हे देखील आगामी काळात पाहायला मिळेलच. तसंच बावनकुळेंच्या संदर्भातील प्रश्नावर महाराष्ट्रातील पत्रकार हे प्रामाणिक आहेत त्यांच्यावर अशा प्रकारची टिप्पणी करणे योग्य नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. पत्रकारांनी महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा केली नव्हती, असं म्हणत त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवरही टीका केलीय. चहा आणि धाब्यावर जाण्यासारखं पत्रकारांचं महाराष्ट्रात चित्र नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.