महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्या सत्कारप्रसंगी बोलताना शरद पवार पुणे: शिवराज राक्षेने नांदेडचे प्रतिनिधित्व केले असले तरी त्याचे बालपण हे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर खेडमध्ये गेलेले आहे. त्यामुळे तो पुणे जिल्ह्याचासुद्धा मुलगा आहे. लहानपणापासून त्याला कुस्तीची आवड होती आणि हे मी जाणत होतो. मीसुद्धा शिवराज राक्षेंना मदत केली आहे आणि ज्या पैलवानांना मदत केली त्याने त्यांच्या कर्तृत्वाने मोठे नाव केले आहे. नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहायचे, असा मी निश्चय केला होता. त्यामुळे आजसुद्धा त्याचा सत्कार करून त्याच्या पाठीशी उभे आहोत. त्याने आणखी पुढे जावे, अशी अपेक्षा यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
पवारांनी कुस्ती संघटनेचा वाद मिटवला :यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा वाद मोठा चर्चेला गेला. कित्येक दिवस खासदार शरद पवार हे या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर त्यांच्याच अध्यक्षतेखाली महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवल्या जात होत्या. यावेळी प्रथमच अखिल भारतीय कुस्तीगीर संघाने ही परिषद बरखास्त केली. अस्थाई समिती निर्माण केली आणि त्यामुळे दोन संघटनांमध्ये मोठा वाद झाला. शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले जाते का? असेही म्हटले गेले; परंतु शरद पवार यांनी कुस्ती संघाचे ब्रिजमोहन सिंह यांना घरी बोलून दिल्लीत हा सगळा वाद मिटवला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली. महाराष्ट्रातल्या महाकुस्तीचा महाकुंभ संपून महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र केसरी मिळाला.
कुस्तीतल्या योगदानाचा उल्लेख :दोन संघटनांमध्ये वाद व्हायला नको होता; पण तो झाला असेसुद्धा यावेळी शरद पवार म्हणाले. मी कधीच खेळात राजकारण आणत नाही. खो-खो, क्रिकेटसह अनेक संघटनाचा मी अध्यक्ष असल्यामुळे प्रत्येकवेळी खेळाडूंच्या मागे उभा होतो. परंतु मी कधी हे बोलून दाखवले नाही. आज प्रथमच मी ज्या खेळाडूंना मदत केलेली आहे, त्याचे नाव सांगत आहे. हे सगळे माझ्यात आणि काका पवारांमध्ये राहायचे असे म्हणत शरद पवारांनी यानिमित्ताने स्पष्ट केले.
शरद पवार यांचे संकेत :महाराष्ट्र केसरी स्पर्धेमधून महाराष्ट्रामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. कुस्ती स्पर्धा घ्यायची कोण इथून वादाची सुरुवात झाली. अखेर पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. भारतीय कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र अस्थायी या दोन कुस्तीगीर परिषदेमध्ये वाद होता. शरद पवार या सगळ्याच्या केंद्रस्थानी होते. शरद पवार यांना महाराष्ट्र केसरीचे निमंत्रण होते. मात्र दुसऱ्या काही कार्यक्रमामुळे ते स्पर्धेला उपस्थित राहू शकले नाहीत. कुस्तीमध्ये वाद व्हायला नको. मात्र आता हा वाद न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर काही बोलणार नाही, असे पवारांनी स्पष्ट केले. वाद मिटेल असे संकेतसुद्धा शरद पवार यांनी यावेळी दिले.
शरद पवारांकडून इतर पैलवानांना मदत: काका पवार यांच्या तालमीतील पैलवानांपैकी तब्बल दहा ते बारा पैलवानांना मदत केल्याचेसुद्धा शरद पवारांनी सांगितले आहे. त्यासाठी जवळपास 76 लाख रुपये खर्च आलेले आहे. ही बाब आजपर्यंत सांगितली नाही, असे म्हणत या यादीमध्ये जवळपास सहा ते सात महाराष्ट्र केसरी आणि नामवंत पैलवानांची नावे त्यांनी यावेळी सांगितली. महाराष्ट्रातील महाराष्ट्र केसरी ही जरी एक खेळाडूंची कुस्ती स्पर्धा असली तरी या संस्थेमधला, राजकीय संघर्ष हासुद्धा महाराष्ट्राला माहीत आहे. शरद पवार यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले जाते, असे एक प्रकारे बोललो जात होते. परंतु आज दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र केसरीला घरी बोलवून आपले त्याच्यासाठी असलेले योगदान सांगून शरद पवार यांनी कुस्तीसाठी आम्ही केलेले जे काही आहे ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नुसते आयोजन भव्य करून चालणार नाही तर त्यासाठी योगदान द्यावे लागते, असा संदेश एक प्रकारे त्यांनी पत्रकार परिषदेमधून दिलेला आहे.
हेही वाचा :Piyush Goyal On Dilapidated Chawls : एमएमआरडीए आणि म्हाडामार्फत मुंबईतील 11 चाळींचा होणार पुनर्विकास - पीयूष गोयल