पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फेसबुकवरून धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हे शाखेने रविवारी पुण्यातील एका 34 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. सागर बर्वे असे या आरोपीचे नाव आहे. रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तरुण हिंदुत्ववादी संघटनेशी निगडित आहे : सागर बर्वे हा तरुण गेल्या दोन वर्षांपासून पुण्यातील कोथरूड येथील्या वात्सल्य पुरम सहकारी गृहरचना येथे त्याच्या वडिलांसोबत राहतो आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तो फार्मास्टिट आहे. सोसायटीच्या चेअरमनने सांगितले की, सागर हा दोन वर्षापासून इथे राहत असून तो हिंदुत्ववादी संघटनेशी निगडित आहे.
'तुमचा दाभोलकर करू' अशी धमकी :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरसह फेसबुकवरूनही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने त्यांची अवस्था 'नरेंद्र दाभोलकरांसारखी करू', अशी धमकी दिली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची 2013 मध्ये पुण्यात भरदिवसा हत्या करण्यात आली होती.
आयपी अॅड्रेसवरून शोधले : फेसबुकवरील धमकीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने शुक्रवारी पुण्याच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान, ज्या आयपी अॅड्रेसवरून धमकीची पोस्ट अपलोड करण्यात आली होती तिचा शोध पोलिसांनी घेतला. तपासानंतर, धमकी देणारा व्यक्ती हा सागर बर्वे असल्याचे गुन्हे शाखेला आढळून आले.
अमरावतीतील तरुणावरही धमकीचा आरोप : शरद पवार यांची कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना फेसबुक आणि ट्विटरवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या आधी या प्रकरणी अमरावतीतील सौरभ पिंपळकर या तरुणावर ट्विटरवरून धमकी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचाही आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा :
- Sharad Pawar death threat : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी...काही घडले तर गृहमंत्रालय जबाबदार-सुप्रिया सुळे
- Sharad Pawar : जिवे मारण्याच्या धमकीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
- Sharad Pawar Threat Case: शरद पवारांना धमकी देणाऱ्यास अटक करून मास्टरमाईंड शोधा - अजित पवार