पुणे - भाजपने सध्याविरोधी पक्षातील नेते स्वतःच्या पक्षात सामावून घेण्याचाधोरणात्मक निर्णय घेतलेला दिसतो आहे, असा उपरोधीक टोला शरद पवारांकडून लगावण्यात आला. ते बारामतीत बोलत होते. यावेळी त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उस्मानबादमधून राणा जगतसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.
रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी दोन दिवसांआधीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. ते माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. यावेळी विजयसिंह मोहिते पाटलांवर राष्ट्रवादी कारवाई करणार आहेत का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही यांच्यावर लगेच कारवाई करणार नाही. सगळ्या महाराष्ट्रातील कार्यकर्ते मला मेसेज करतायेत, साहेब त्यांच्यासारखा अन्याय आमच्यावरही करा. विजयसिंह मोहिते पाटलांना अनेक मोठी पद दिली. जाणीवपूर्वक प्रोत्साहित करण्यासाठी ही पद दिली होती. त्याबाबत कुठला वेगळा विचार आमचा नव्हता. पण त्यांच्या मनात काही वेगळा विचार आला त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा.
त्यानंतर भाजपवर टीका करतांना ते म्हणाले, सध्या चंद्रकांत पाटील जे बोलतात त्याबद्दल मला आनंद आहे. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, लोकांतून निवडून आले नाही, असे लोक आता महाराष्ट्राला मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्र त्यांना किती गंभीरतेने घेईल यात शंका आहे. भारतीय जनता पार्टीने सध्या दुसर्या पक्षातील नेते जास्तीत जास्त घेण्याचाधोरणात्मक निर्णय घेतलेला दिसतो आहे. एकेकाळी विचारावर चालणारा पक्ष असा भाजपबाबत समज होता पण आता भाजपचे सगळे विचार बाजूला राहिलेले आहेत. वेगळ्या पद्धतीने निर्णय घेण्याची पद्धत सुरू झाली आहे.
राज ठाकरे यांनी माझी भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं आता माझा एक कलमी कार्यक्रम आहे. या देशाच्या भल्यासाठी मोदींच्या हातातून सत्ता काढली पाहिजे आणि त्यासाठी मला जे काही करता येईल ते मी महाराष्ट्रात करणार आहे. त्यांचे पुढचे धोरण आहे ते गुढीपाडव्याला जाहीर करतील, असे त्यांनी मला या चर्चेवेळी सांगितले आहे, असेही ते यावेळी म्हणाले. मी कधीही कुठलेच विधान बदललेले नाही, कोणते विधान बदलले ते सांगावं. माढा लोकसभा लढण्याबाबत ही मला कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता.
पार्थ पवारांबद्दल बोलतांना ते म्हणाले, मी त्याला कुठलाही सल्ला देणार नाही. नवीन कार्यकर्त्यांना सुरुवातीला ठेचा लागत असतात. त्यातून ते शिकतात आणि नंतर त्यांची पावले योग्य दिशेने पडतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना असे काही जण आम्ही एकत्र आलो आहोत. काही ठिकाणी थोडे फार गैरसमज आहेत ते दूर केले जातील. त्यासाठी दोन्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एकत्र बसून गौरसमज दूर करतील. उद्या पासून आम्ही सर्व निवडणुकीच्या तयारीला लागणार आहोत, असेही ते म्हणाले.