महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sharad Pawar criticizes BJP : राज्यात महिला गायब होण्याचे प्रमाण वाढले, पवारांचा घणाघात, मोदींनाही सुनावले खडे बोल - महिलांच्या गायब होण्याचे प्रमाणही वाढले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्याच्या गृहविभागाची चांगलीच हजेरी घेतली. त्यांनी आकडेवारी देऊन महिला आणि मुलींच्यावर राज्यात कसे अत्याचार होत आहेत याची जंत्रीत पुण्यातील पत्रकार परिषदेत वाचली. पंतप्रधान मोदींवरही पवारांनी निशाणा साधला.

Sharad Pawar
Sharad Pawar

By

Published : Jun 29, 2023, 4:36 PM IST

Updated : Jun 29, 2023, 8:12 PM IST

पवारांचा घणाघात

पुणे -राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चिंतेचा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. महिला अत्याचारात राज्यात वाढ झाल्याचे त्यांनी आकडेवारी देऊन सांगितले. कायदा सुव्यवस्थेवरुन पवारांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. महिला आणि मुलींवरील हल्ले वाढले असल्याचे सांगून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

महिला गायब होण्याचे प्रमाण मोठे -राज्यात हल्लीच्या काळात महिलांच्या गायब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, या शहरातून महिला गायब होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. या शहरांमधून सुमारे अडीच हजार महिला गायब झाल्या आहेत. तसेच राज्यातील १४ जिल्ह्यातून ४४३१ महिला गायब झाल्या आहेत, असे आकडेवारी देऊन पवार यांनी सांगितले.

समान नागरी कायद्याचा विचार करा - जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा पंतप्रधान मोदी प्रयत्न करत असल्याची टीकाही पवार यांनी केली. देशात अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. अशावेळी त्यांनी मोठी पावले उचलण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे. समान नागरी कायद्याबाबत ज्या सूचना आल्या आहेत. त्या सरकारने व्यवस्थित तपासाव्यात असेही पवार म्हणाले.

कर्नाटकात आमदार फोडले -भाजपच्या राजकारणावरही शरद पवार यांनी सडकून टीका केली. गुजरात यूपी आणि पूर्वेकडील छोट्या राज्यातच भाजपची सत्ता आहे असे पवार म्हणाले. त्यामुळे त्यांनी मोठ्या वल्गना करु नयेत असा गर्भित इशाराही पवार यांनी दिला. तसेच गोवा, कर्नाटकात आमदार फोडले असे पवार यांनी सांगितले. अनेक राज्यात आमदार फोडून भाजपने सत्ता मिळवली असा आरोप शरद पवार यांनी भाजपवर केला. महाराष्ट्रात काय झाले ते वेगळे सांगण्याची गरज नाही असेही पवार म्हणाले.

शिखर बँकेचा माझा संबंध नाही -मणिपूर धगधगत आहे. तिथे काय घडत आहे, याकडे सरकारचे लक्ष नाही. माझी मुलगी तीनवेळा लोकसभेवर निवडून आली आहे. तिने तिचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे तिच्यावर आरोप करण्यापूर्वी विचार करावा असेही पवार म्हणाले. तसेच माझा कोणत्याही संस्थेशी संबंध नाही. तरीही तसा संबंध लावून काहीही आरोप सुरू आहेत. शिखर बँकेचा माझा संबंध नाही तरीही मोदींनी त्याचा उल्लेख केला. तो त्यांनी करायला नको होता असे पवार म्हणाले.

महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातीय दंगली झाल्या. कोल्हापूर, कन्नड, नांदेड, अकोला, अंमळनेर इथे दंगली झाल्या.राज्यात कायदा आणि सुव्यवस्था काय परिस्थीती आहे हे लक्षात येते.पाटण्यात विरोधी पक्षांच्या एकजुटीची बैठक झाली.तिच्यावर फोटोजनिक म्हणून टीका झाली.मात्र आमची एकजूट बघून ते अस्वस्थ झाले. मंगळवारी 13 जुलै ला सिमला ऐवजी बेंगलोर ला बैठक होणार आहे. त्यात पुढील नियोजनाबाबत चर्चा होणार आहे. समान नागरी कायदा संदर्भात निर्णय घेण्याआधी महिलांना आरक्षणचा निर्णय घेणे गरजेचे आहे. राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद मध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण दिलेले आहे. विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना देखील 50 टक्के आरक्षण देण्याची भूमिका सरकारने घ्यावी. राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा देईल, असे देखील यावेळी पवार म्हणाले.

Last Updated : Jun 29, 2023, 8:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details