पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील महत्वाचे नाव. सातत्याने त्यांच्याभोवती देशासह राज्याचे राजकारण फिरत असते. बारामतीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या शरद पवारांनी देशाच्या राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. राजकारणाबरोबरच समाजकारण, कला, क्रीडा, साहित्य, शेती, सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. आज त्यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी बारामतीकरांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न...
बारामतीचं आणि शरद पवारांचं अतूट नातं आहे. राजकारणात प्रवेश केल्यापासून शरद पवारांना बारामतीकरांनी खंबीरपणे साथ दिली आहे. त्यांच्या पाठीशी आजतागायत बारामतीकर सतत उभे आहेत. शरद पवार असो अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी बारामतीकर नेहमीच ठाम असतात. त्याला कारणही तसंच आहे. पवार कुटुंबीयांनी बारामती सारख्या ग्रामीण भागात जिल्हा पातळीवरील सर्व सुखसोई उपलब्ध करून दिल्या आहेत.
शरद पवारसाहेबांसारखे नेतृत्व आजपर्यंत भारतात झालेलं नाही. भविष्यात होईल असं मला वाटत नसल्याच्या भावना डॉ. मुरलीधर घोळवे यांनी व्यक्त केल्या. त्यांनी सर्व स्तरात म्हणजेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शेती या सर्व क्षेञात दूरदृष्टी ठेवून काम केलं आहे. आज देशभरातील पोलीस फूल पँन्टमध्ये आण्याचे व संरक्षण क्षेत्रात महिलांचा सहभाग, तसेच महिलांना आरक्षण असे मोठे निर्णय शरद पवारांनी घेतल्याचे घोळवे यांनी सांगितले.