'वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्यास शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा निघू शकतो' - शरद पवार न्यूज
शेतकरी आंदोलकांशी, देशाच्या वरिष्ठ नेत्याने चर्चा केल्यास, यातून तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
शेतकरी आंदोलन : ...तर मार्ग निघण्याची शक्यता - शरद पवार
पुणे - शेतकरी आंदोलनाबाबत सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. कोणत्या तरी वरिष्ठ नेत्याने यात चर्चा करण्याची गरज आहे. मला तोमर यांच्याबद्दल अनादर व्यक्त करायचा नाही. तर यात स्वतः पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री किंवा नितीन गडकरी अशा नेत्यांबरोबर जर त्यांनी चर्चा केली, तर कदाचित त्यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
'स्वातंत्र्यानंतर कधी असे घडले नाही - शरद पवार'
आत्तापर्यंत स्वातंत्र्यानंतर या देशात कधी असे घडले नाही, की आंदोलक रस्त्यांनी येऊ नयेत, म्हणून खिळे ठोकून रस्ते बंद केले आहेत. असे एकदा ही झालेले नाही. सरकारने ही अतीटोकाची भूमिका घेतल्याने त्यांचे धोरण स्पष्ट होत आहे. पण तरीही अन्नदाता जर रस्त्यावर बसतोय तर त्याबाबत एक समंजसपणा दाखवण्याची गरज असते. त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, असेही यावेळी शरद पवार म्हणाले.
'...म्हणून परदेशातून सहानभूती मिळत आहे'
एवढ्या मोठ्या प्रमाणात, इतके दिवस कष्टकरी वर्ग रस्त्यावर ऊन थंडीचा तमा न बाळगता बसला आहे. यामुळेच त्यांच्याबद्दलची सहानभूती देशात तर होतीच पण देशाच्या बाहेरही आत्ता सहानुभूती व्यक्त व्हायला लागली आहे. ते काय फार चांगले नाही, पण आपल्या राज्यकर्त्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा, असे ते म्हणाले.
'सत्ताधारी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न'
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे कधी खलिस्थानी म्हणत आहेत तर कधी अतिरेकी म्हणत आहेत. याला काहीही अर्थ नाही. जो शेतकरी आपल्याला अन्न-धान्य पुरवतो त्याच्याबद्दल असे बोलणे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही, असेही यावेळी पवार म्हणाले.
'कारण शेती हा राज्यांचा विषय आहे'
माझ्या पत्रात असा उल्लेख आहे, की या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा. कारण शेती हा राज्यांचा विषय आहे. असे पत्रात मी लिहिले होे आणि तेच पत्र आज ते दाखवत आहेत. माझा हेतू हा होता, की याबाबत जर कायदा करायचा असेल आणि तो विषय राज्याच्या अखत्यारीतील असेल तर राज्यांनीच याच्यात पुढाकार आणि मत व्यक्त केले पाहिजे. इथे काय झाले तर ३ कायदे केले आणि ते लोकसभेत गोंधळात मंजूर केले. ही भूमिका आमची नव्हती. कदाचित तोमरांनाही माहित नसावी म्हणून असे भाषण त्यांनी केले, असेही पवार म्हणाले.