पुणे Sharad Pawar :पुण्यात आज (३० डिसेंबर) महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची समारोप सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. "राज्याच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचावा यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता", असं शरद पवार म्हणाले.
देशातील शेतकरी अस्वस्थ आहे : "आज राज्यासह देशातील शेतकरी अस्वस्थ आहे. यवतमाळात २५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी मिळाली. देशाची भूक भागवणारा शेतकरी आत्महत्या करतोय. माझ्याकडे जेव्हा हे खातं होतं तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत मी पंतप्रधानांना घेऊन शेतकऱ्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा कळलं की, शेतकऱ्यांनी सावकार आणि बँकेतून कर्ज घेतलं होतं. दुष्काळ आला तेव्हा बॅंकेनं घराचा लिलाव केला. यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या", असं पवार म्हणाले.
कृषी प्रधान भारताला कृषी मंत्री नाही : "शेतकऱ्यांचा सन्मान नाही झाला की शेतकरी आत्महत्या करतो. त्यावेळी मी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं. मात्र आज त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पाहात नाही. आज जगावं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कृषी प्रधान भारताला कृषी मंत्री नाही. अश्यानं देश कसा चालणार?", असा सवाल शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला. "आज आक्रोश मोर्चा पुण्यापुरता मर्यादित नसून त्याचा आवाज अख्या देशात गेला आहे," असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित : या कार्यक्रमाला शरद पवारांसह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे तसेच खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. यासह या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्त्यांची देखील हजेरी होती.
हे वाचलंत का :
- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत दुसरीकडं जाण्याचा विचार नाही : बच्चू कडूंनी केलं स्पष्ट
- शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढवण्यावर ठाम, गल्लीबोळातील नेत्यांचं कोण ऐकणार - संजय राऊत
- कसा झाला राष्ट्रवादीत राजकीय भूकंप? अजित पवारांच्या बंडखोरीमागं कुणाचा हात?