पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीपासूनच काँग्रेस, शिवसेनेसोबत जायचे ठरवले होते. जर त्यांना भाजपसोबत जायचे होते तर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना घेऊन ते गेले असते. त्यांना कुणीही अडवले नसते. त्यांनी स्वतः सांगितले असते की आपण सर्व भाजपसोबत जाऊ. मात्र, त्यांच्या मनात तसे काही नव्हते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याची, टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली.
'भाजपसोबत जायचं असतं तर पवारांना कुणीही अडवलं नसतं' हेही वाचा -हिंदूच गायींचे ठेकेदार आहेत, तेच गाय कापायला पाठवतात - सरसंघचालक मोहन भागवत
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्तास्थापनेसाठी आमच्याकडे आले होते आणि शरद पवार यांना याची कल्पना होती, असे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. आज (रविवारी) येथे एका कार्यक्रमासाठी ते आले असता त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आमचा सहयोगी पक्ष होता. त्यामुळे शरद पवार यांनी आधी काँग्रेसला विश्वासात घेतले. त्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा केली. त्यानंतरही दिल्लीत 2-3 वेळा चर्चा झाली. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम झाला आणि नंतर एकत्र येण्याचे ठरले, असेही भुजबळ यांनी सांगितले.
हेही वाचा -वारंवार अन्याय होत असेल, तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल; एकनाथ खडसेंचे पक्ष सोडण्याचे संकेत