(खेड) पुणे - खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या आणि त्यानंतर या राजकीय घडामोडींना लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगरमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तसेच स्थानिक पोलिसांसह, राज्य राखीव दल व दंगा काबू पथकाचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.
सभापती पोखरकरांवर अविश्वास प्रस्ताव -
खेडचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावर एकूण १४ पंचायत समिती सदस्यांपैकी ११ जणांनी अविश्वास ठराव दाखल केलेला आहे. त्यासाठी सोमवारी ३१ मे सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात मतदान घेण्यात येणार आहे. हा अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर ते ११ सदस्य पुण्याजवळच्या डोणजे या ठिकाणी एका रिसॉर्टवर ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी २७ मेला पहाटे सभापती व त्यांच्या समर्थकांनी धिंगाणा केला. त्यानंतर सभापती पोखरकर व अन्य काहीजणांवर गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या दिवशी सभापतींना अटकही झाली.