पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यक्रमांतर्गत ‘कोविड १९ आपत्ती व्यवस्थापन अभियान’ राबविण्यात येत असून, त्यात तब्बल ५३ हजार २३२ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या आपत्तीतून मार्ग काढण्यासाठी या विद्यार्थ्यांनी ५.४३ लाख मास्क आणि ४८९० लिटर सॅनिटायझरची निर्मिती केली आहे. याशिवाय २५ हजारांहून अधिक रक्तदात्यांची यादी तसेच १ लाख ४३ हजार कुटुंबांचे सर्वेक्षणही या विद्यार्थ्यांनी केले आहे.
सध्याच्या कोरोना विषाणू संसर्गाच्या आपत्तीच्या काळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची यंत्रणेला मदत आणि सहकार्य व्हावे, या उद्देशाने कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांच्या पुढाकाराने विद्यापीठाने ‘कोविड १९ आपत्ती व्यवस्थापन अभियान’ सुरू केले आहे.