पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची श्क्यता आहे. हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्या नातवाने बुधवारी पुणे येथील न्यायालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आहे. सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी सांगितले की, त्यांच्या वकिलांनी भारतीय दंड संहिता कलम 499 आणि 500 अंतर्गत तक्रार घेऊन पुणे शहर न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच राहुल गांधींनी माझे आजोबा विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला आहे, त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.
सावरकरांबाबत केलेले वक्तव्य खोटे: सात्यकी सावरकर म्हणाले की, आज कोर्टामध्ये काही अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे आम्हाला परत शनिवारी बोलवण्यात आले आहे. मानहानी दाव्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, राहुल गांधी लंडनमध्ये बोलताना तिथल्या लोकांना एक गोष्ट सांगितली की, सावरकर यांनी एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकांमध्ये पाच ते सहा लोक मुस्लिम मुलाला मारत आहेत. त्यावेळी सावरकरांना आनंद झाला होता, असे विधान त्यांनी लंडनमध्ये केले होते.
सावरकरांचा लोकशाहीवर विश्वास होता : सावरकर म्हणाले, सगळ्यात पहिली गोष्ट राहुल गांधी यांनी सांगितलेली घटना ही काल्पनिक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले सावरकर, यांच्या जीवनात अशी कुठलीही घटना घडलेली नाही. सावरकर लोकशाहीवर विश्वास ठेवत होते. त्यांनी मुसलमानांना वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा सल्ला दिला होता. राहुल गांधीने सावरकर यांच्या विषयी केलेले, हे वक्तव्य खोटं, दुर्भाग्यपूर्ण आणि अपमान जनक आहे, त्यामुळे आम्ही हा दावा दाखल करत आहोत असे ते म्हणाले.