पुणे - ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेविकेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरती कोंढरे असे त्या नगरसेविकेचे नाव आहे. मात्र, आता कोंढरे यांच्यावर डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्या शिवाय कोंढरेंवर कारवाई न झाल्यास अत्यावश्यक सेवा वगळता इतर ठिकाणी कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही मार्डच्या डॉक्टरांनी दिला आहे. या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना पत्र देण्यात आले आहे.
ससून रुग्णालय मारहाण प्रकरण; नगरसेविकेवर कारवाईसाठी डॉक्टरांचा काम बंदचा इशारा
डॉक्टरला मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेविकेवर कारवाई करा.... ससून रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांची रुग्णालय अधिष्ठांताकडे मागणी... काम थांबवण्याचा दिला इशारा...
मंगळवारी रात्री भाजपच्या नगरसेविका आरती कोंढरे यांनी ससून रुग्णालयात वार्ड क्रमांक ४३ मध्ये रुग्णावर उपचार करत असलेल्या डॉक्टर स्नेहल खंडागळे यांना मारहाण केली होती. आरती कोंढरे यांनी एका रुग्णावर तातडीने उपचार करण्यास सांगितले होते, यावरून वाद झाला आणि कोंढरे यांनी डॉक्टर स्नेहल खंडागळे यांना मारहाण केली होती. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेला चोवीस तास उलटून गेल्यानंतरही कोंढरे यांना पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मार्डच्या डॉक्टरांनी ससूनच्या अधिष्ठातांना पत्र लिहिले, की कोंढरे यांना अटक करावी तसेच त्यांच्यावर डॉक्टर प्रोटेक्शन कायद्यानुसार कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.