पुणे - सिरम इन्स्टिटय़ूटच्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच सुरू होणार आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. या चाचणीसाठी स्वयंसेवकांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. ज्या स्वयंसेवकांना चाचणीत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोविशिल्ड चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरात दीड हजार स्वयंसेवकांना सहभागी केले जाणार आहे. लसीच्या चाचणीचा हा भारतातील तिसरा व अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. ससूनमध्ये साधारण 150 स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार आहे. ससून रुग्णालयात या चाचणीसाठी काही स्वयंसेवक पुढे आले आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
कोरोनावर लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी, यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. भारतात १७ ठिकाणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या लसीच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. इंग्लडमधील तिसऱ्या टप्यातील चाचणी दरम्यान इंग्लंडमधील एका स्वयंसेवकाची तब्बेत बिघडल्याने ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी जगभरात थांबवण्यात आली होती. अॅस्ट्राझेन्का कंपनीने याची घोषणा केल्यानंतर सिरम इन्स्टिटय़ूटद्वारे भारतात सुरू असलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीच्या मानवी चाचण्यांना भारतीय औषध नियंत्रक विभागाकडून (DCGI) स्थगिती देण्यात आली होती. कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी पुढील आदेश येईपर्यंत नव्या स्वयंसेवकांना घेतले जाऊ नये, असे डीसीजीआयने आदेशात म्हटले होते.
मात्र, १५ सप्टेंबरला डीसीजीआयने ‘कोविशिल्ड’ या लसीची थांबवण्यात आलेली चाचणी पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे सिरमचा भारतातील चाचण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
चाचणीसाठी स्वयंसेवक नोंदणीसाठी संपर्क क्रमांक - 020- 8550960196 आणि 8104201267