पुणे Sassoon Drug Case :ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून गेल्यानं मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याच्या साथीदाराला पुणे पोलिसांच्या पथकानं नेपाळ बॉर्डरवरुन ताब्यात घेतलं. आता पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या घराची झाडाझडती सुरू केली असता, त्याच्या घरातून 3 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. ड्रग तस्कर ललित पाटील याच्या घरातून 3 किलो सोनं आढळल्यानं पोलिसांनी ललित पाटीलच्या इतर मालमत्तांची झाडाझडती सुरू केली आहे.
- ड्रग विक्रीच्या पैशातून सोनं खरेदी :ललित आणि भूषण पाटील यांनी अमली पदार्थांच्या विक्रीतून आलेल्या पैशातून मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करून ठेवल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी ललित पाटील याच्या नाशिक येथे घराची झडती घेतली. यावेळी पोलिसांच्या हाती तीन किलोहून अधिक सोनं सापडलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अमली पदार्थांच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा पोलिसांना संशय :पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत. पुणे पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरुन भूषण आणि अभिषेक या दोघांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक इथल्या घरातून पोलिसांनी हे सोनं जप्त केलं आहे. दरम्यान, कोर्टात पोलिसांनी संशय व्यक्त करताना ड्रगच्या आलेल्या पैशातून त्यांनी स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं म्हटलं होतं. एका दिवसातच पोलिसांच्या हाती अवैध मार्गातून मिळविलेल्या पैशातून पाटील बंधूनं मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केल्याचं आता समोर आलं आहे.
अभिषेकही ड्रग निर्मिती करून विक्रीच्या रॅकेटमध्ये सहभागी :ललित पाटील आणि भूषणसोबत अभिषेक देखील ड्रग निर्मिती करुन विक्री करण्याच्या रॅकेटमध्ये सहभागी होता. अभिषेक हा भूषण याचा मित्र असून तो अभियंता आहे. त्याच्यासोबत काम करत असल्यामुळे या दोघांच्या अमली पदार्थ निर्मिती आणि विक्रीची त्याला माहिती होती. अनेकदा त्यातून आलेले पैसे तो हाताळत होता.