महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदारांप्रमाणे सरपंचांनादेखील निधी दिला जावा - सरपंच परिषदेच्या मागण्या - आमदारांप्रमाणे सरपंचांना देखील निधी

सरपंचांमधून देखील किमान एक आमदार विधान परिषदेवर निवडला जावा. तसेच ज्याप्रमाणे नगरसेवक, आमदारांना पक्षांतर बंदी कायदा आहे, तसा कायदा ग्रामपंचायत सदस्यांना लागू करावा, अशा काही मागण्या सरपंच परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी केल्या.

पुणे
पुणे

By

Published : Dec 6, 2020, 9:52 PM IST

पुणे- ज्याप्रमाणे आमदारांना आस्कमित निधी दिला जातो, तसा निधी राज्यातील सर्व सरपंचांना द्यावा. ज्याप्रमाणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून आमदार निवडले जातात, त्याप्रमाणे सरपंचांमधून देखील किमान एक आमदार विधान परिषदेवर निवडला जावा. तसेच ज्याप्रमाणे नगरसेवक, आमदारांना पक्षांतर बंदी कायदा आहे, तसा कायदा ग्रामपंचायत सदस्यांना लागू करावा, अशा मागण्या सरपंच परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी केल्या.

पुणे
पिंपरी-चिंचवड येथे महाराष्ट्र मुंबई सरपंच परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश उपाध्यक्ष अनिल गिते, राज्य सरचिटणीस ॲड. विकास जाधव, राज्य प्रसिध्दी प्रमुख संजय जगदाळे आदी उपस्थित होते.
सरकार कोणाचेही असले तरी खेड्यांकडे प्रत्येकाचे दुर्लक्ष
दत्ता काकडे म्हणाले की, राज्यात सरकार कोणाचेही असो, गाव खेड्याकडे प्रत्येक सरकारने दुर्लक्ष केले आहे. सर्व जनतेतून सरपंच निवडणे हा निर्णय चांगला होता. मात्र सरपंचाने आमदार, खासदारांकडे यावे यासाठी सरकारने या कायद्यात बदल करून ग्रामपंचायत सदस्यांतून सरपंच निवडीची जुनी पध्दत पुन्हा लागू केली. सरपंचाकडून चांगले काम होणे अपेक्षित असेल तर ग्रामपंचायत सदस्यांना पक्षांतर बंदी प्रमाणे पॅनेल बंदी कायदा लागू करावा. विधान परिषद सदस्य निवडणुकीत राज्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे.


राज्यातील ७० टक्यांहून जास्त ग्रामपंचायती पाच हजार लोक संख्येपेक्षा कमी

गावच्या सरपंचाला तीनशे रुपये मानधन आणि शिपायाला सात हजार तर संगणक चालकाला चौदा हजार मानधन ही तफावत दूर झाली पाहिजे. राज्यातील अठ्ठावीस हजार पैकी ७० टक्यांहून जास्त ग्रामपंचायती पाच हजार लोक संख्येपेक्षा कमी आहेत. पाच हजार लोकसंख्ये पुढील ग्रामपंचायतींना केंद्राच्या पंधराव्या वित्त आयोगाप्रमाणे साधारणता पाच लाख रुपये निधी मिळतो. मात्र, यामध्ये संगणक चालकाचेच वार्षिक 1 लाख 48 हजार मानधन असते. उरलेल्या निधीतून अपंगांना सुविधा, अंगणवाडी, हातपंप, वीजबील, सार्वजनिक स्वच्छता, पाणी व्यवस्था ग्रामपंचायतीला करावी लागते.

शासनाने भरघोस निधी दिला तरच गाव खेड्यांचा विकास

संगणक चालकाचे मानधन देणे म्हणजे मिळालेल्या वित्त आयोगाच्या निधीतून ठेकेदारांची वसूली करून देण्याचे काम शासन करते की, काय असे वाटते. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून शासनाने ‘आर्सेनिक अल्बम’ गोळ्यांच्या नावाखाली परस्पर निधी कापून घेतला आहे. ‘पाणी आणि माती’ या दोन विषयांवर प्रत्येक ग्रामपंचायतीने काम केले आणि शासनाने भरघोस निधी दिला तरच गाव खेड्यांचा विकास होईल, असा आशावाद दत्ता काकडे यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details