पुणे - पंधरा दिवस संत तुकाराम महाराजांनी भामचंद्र डोंगरावर अनुष्ठान केले. त्यानंतर त्यांना विठ्ठलाचा साक्षात्कार झाल्याचे बोलले जाते. भामचंद्र डोंगरावर विठ्ठलाची आस लागलेल्या तुकाराम महाराजांना निर्गुण-निराकार विठ्ठलाची भेट झाली. याच भामचंद्र डोंगरावर पांडवकालीन गुहा आहे. तसेच गुहेत संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे दगडात कोरलेले शिल्पही आहे. या भक्तीचा महिमा येथे येणारा प्रत्येक भाविक आपल्याला सांगतो.
भामचंद्र डोंगर हा खेड आणि मावळ तालुक्याच्या सीमेवर आहे. डोंगरावर जाण्यासाठी पाऊलवाट आहे. भामचंद्र डोंगराच्या मध्यावर गेल्यानंतर कीर्तनासाठी तयार केलेला चौथरा आहे. त्याच्यापुढे सपाट पठारी मैदान आहे. त्याठिकाणी हरिनामाचा सप्ताह भरला जातो. यासाठी राज्यभरातून अनेक वारकरी या सप्ताह सोहळ्यात सहभागी होत असतात. त्याच ठिकाणाहून वर पाहिल्यास सुमारे 800 ते 900 फूट कातळकडा आणि तोही उलटी टोपीच्या आकाराचा असून या ठिकाणी पांडवकालीन गुहा आहे. गुहेकडे जाण्यासाठी अंदाजे 50 ते 55 पायर्या वर चढून गेल्यावर त्याठिकाणी एका छोट्याशा गुहेमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. शेजारीच भिंतीवर संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचे शिल्प कोरलेले आहे.
हेही वाचा...'गायीं'वर आधारित शेती करणाऱ्यांना दर महिन्याला मिळणार नऊशे रुपये
भामचंद्र डोंगर हा संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पवित्र असल्याची भावना येथे येणारा प्रत्येक जण व्यक्त करत आहे. याठिकाणी आळंदी देहू येथून सांप्रदायाचे शिक्षण घेतल्यानंतर ज्ञानेश्वरी गाथा असे विविध ग्रंथाचे पाठांतर करण्यासाठी अनेक विद्यार्थी येतात. तसेच या ठिकाणी संत परंपरेचा अभ्यास करत आहेत. शांत वातावरणात केलेला भक्तीचा अभ्यास स्मरणात राहतो, यासाठी विद्यार्थी याठिकाणी अभ्यास करत आहेत.