पुणे Sanjivan Samadhi Sohala 2023 : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जनक गुरुवर्य हैबतबाबा आरफळकर यांच्या पायरी पूजनानं या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं 5 ते 12 डिसेंबर या कालावधीत आळंदीत कार्तिकी वारी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्यभरातील वारकरी, भाविक आळंदीनगरीत दाखल होऊ लागले आहेत. 700 वर्षांपूर्वी विठ्ठलानं आपला लाडका भक्त ज्ञानेश्वर माऊलींना यापुढं दरवर्षी संजीवन समाधी सोहळ्याला आळंदीस येईल, असा शब्द दिला होता. आज देवाच्या पादुकांसह हजारो भाविकांनी आळंदीकडं प्रस्थान केलं आहे.
संजीवन सोहळ्याची जय्यत तयारी : कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी देवस्थान आणि आळंदी पालिका यांच्याकडून जय्यत तयारी सुरू आहे. भाविकांना पिण्याचं पाणी, आरोग्य तपासणी, मोबाईल टॉयलेट आदी सोयीसुविधादेखील देवस्थानतर्फे उपलब्ध करण्यात येत आहेत. कार्तिकी वद्य एकादशीला मध्यरात्रीपासून माउलींच्या संजीवन समाधीवर अकरा ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात पूजा, दुग्धाभिषेक होईल. त्यानंतर दुपारी माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्याच्या बाहेर पडेल. नगरप्रदक्षिणेनंतर पालखी सायंकाळी मंदिरात पुन्हा प्रवेश करेल. दरम्यान, भाविकांचं दर्शन दिवसभर सुरू राहणार आहे.
माऊलींच्या पालखीची होणार नगरप्रदक्षिणा :रविवारी मध्यरात्री प्रांताधिकार्यांच्या हस्ते माऊलींच्या समाधीवर पहाटे पूजा होईल. त्यानंतर दुपारी रथोत्सवासाठी माऊलींची पालखी मंदिरातून बाहेर पडेल. गोपाळपुरा इथं माऊलींची पालखी रथात ठेवून नगरप्रदक्षिणा केली जाणार आहे. सोमवारी माऊलींचा मुख्य समाधीदिन सोहळा असून मध्यरात्री प्रमुख विश्वस्तांच्या हस्ते पवमान अभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या कालावधीत वीणामंडपात संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांचं माऊलींच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन होईल. दुपारी 12 वाजता घंटानाद, पुष्पवृष्टी आणि आरती झाल्यानंतर माऊलींचा समाधी दिनाचा कार्यक्रम पूर्ण होईल. त्यानंतर आरफळकरांच्या वतीनं जागर होईल. शेवटी अमावास्येला मंगळवारी समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगता फटाक्यांची आतषबाजी आणि पालखी छबिना मिरवणुकीनं होईल.