पुणे Sanjay Raut on Ram Temple : सध्या देशभरात राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्याची चर्चा सुरु आहे. यावरुन भाजपा आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरावरुन भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. ते आज सकाळी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.
राम मंदिराचं मंगल कार्यालय केलं : यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "राम मंदिराचा सोहळा हा देशवासियांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यासाठी आमच्या लोकांनी बलिदान दिलंय. सध्या राम मंदिराचा सोहळा फक्त भाजपाचा झालाय. मात्र हा सोहळा देशाचा व्हायला हवा. हा फक्त धार्मिक सोहळा नसून देशाचा सांस्कृतिक सोहळा आहे. मात्र भाजपानं याला राजकीय सोहळा करुन ठेवलंय. स्वतःच्या घरातील मुंज, लग्नाचं जसं आमंत्रण देतात, तसंच भाजपाचे लोक आमंत्रण देत आहेत. जसं काय राम मंदिराचं यांनी मंगल कार्यालय करुन ठेवलंय. प्रभू श्रीराम सर्व पाहत आहेत. हा राजकीय सोहळा झाल्यावर आम्ही पाहू. राम मंदिरासाठी असंख्य शिवसैनिकांनी त्याग केलाय. त्याला आम्हाला आता कोणतंही गालबोट लावायचं नाही. पण योग्यवेळी आम्ही बोलू," असा इशारा राऊतांनी भाजपाला दिलाय.