पुणे -महाविकास आघाडीचे सरकार 15 दिवसांत कोसळेल, अशा पैजा लागल्या होत्या. पण आता महाविकास आघाडी सरकारचे एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकार पूर्ण ताकदीने चालले आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केले. राऊत हे पुणे दौऱ्यावर आले असून पुणे पत्रकार संघात त्यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी संजय राऊत यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.
सरकारच्या एक वर्षाच्या कामाबाबत राऊत म्हणाले, 'मधला काळ संकटांचाच होता. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लढाई उत्तम प्रकारे मॅनेज केली. मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय ज्ञान आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या आरोग्यविषयक संकटाचे नेतृत्व केले. त्यामुळे हानी कमी झाली, अन्यथा अराजकता माजली असती.'
वृत्तपत्राबाबत बोलताना, क्रांती घडवण्याची ताकद वृत्तपत्रात आहे. माझा विश्वास पेन आणि कागदावर. कोविडचा परिणाम वृत्तपत्रांच्या विक्रीवर झाला आहे. दोन महिन्यांनी सगळं सुरळीत होईल, तेव्हा या वृत्तपत्र क्षेत्राला उर्जितावस्था येईल. लोकांचा वृत्तपत्रावर विश्वास आहे, असे राऊत म्हणाले.
बिहार निवडणुकीवर राऊत काय म्हणाले?
देशाचे नाही जगाचे लक्ष बिहारकडे आहे. या निवडणुकीबाबत लोकांच्या मनात निःपक्षपातीबद्दल शंका आहे. एक तरुण मुलगा या देशातल्या राजसत्तेला आव्हान देत हजारो लाखोंच्या सभा घेत आहे, तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर, आश्चर्य वाटणार नाही, असे राऊत म्हणाले.
शरद पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा सल्ला घेण्यात गैर नाही. तसं नाही केलं तर आमच्या सारखे करंटे आम्हीच, असे सांगत, शरद पवार सरकार चालवत असल्याच्या टीकेला राऊत यांनी उत्तर दिले.
राज ठाकरेंबाबत काय म्हणाले राऊत?
महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. असे सांगत राऊत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. राज्यपालांनी त्यांना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला त्यावर ही राऊत यांनी टीका केली. राज्यपाल यांनी राजभवनाबाहेर येऊन राजकारण करावं, राजभवन हे राजकारण करण्यासाठी नाही, असे ते म्हणाले.
राज्यपालांनी पवारांकडे जायला सांगितलं असेल तर, चांगलं आहे. त्यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे पाठवलं नाही. याचा अर्थ ते आणि भाजपाचे नेतेही पवारांना आपले नेते मानतात. त्यांना मार्गदर्शन हवे असेल तर, मी पवारांशी बोलेन, अशी बोचरी टीका त्यांनी राज्यपालांवर केली.
मराठा आरक्षणाचा विषय, राजांनी मोदींच्या दरबारात न्यावा. कोणीही क्रेडिट घ्यावं, आमची हरकत नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.
पंकजा मुंडे यांना शिवेसेनेची ऑफर आहे का? , याबाबत बोलताना प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पक्षात ऑफर देण्याचा अधिकार फक्त उद्धव ठाकरेंना आहे, बाकी कोणाला नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.