पुणे- दुचाकी थांबवून रस्त्याच्याकडेला पाणी पित असणाऱ्या व्यक्तीला दोन अज्ञात सराईत गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवत लुटण्याची घटना घडली होती. सोन्याच्या दोन अंगठ्या आणि मोबाईल असा ऐवज त्यांनी लुटला होता. त्याप्रकरणी सराईत गुन्हेगारांना सांगवी पोलिसांनी जेरबंद केले आहे. तसेच त्यांच्याकडून १ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
शहारुख रहीम शेख (वय २४) आणि विशाल नानासाहेब आव्हाड (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. दोघांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहे. विशालवर १० तर, शहारुखवर २० गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही सराईत आरोपी हे रहाटणी येथे त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नाला आले होते. रात्री साडेआठच्या सुमारास लग्न सोहळा आटोपून ते पुण्याच्या दिशेने जात होते. तेव्हा संबंधित तक्रारदार हे दुचाकी रस्त्याच्याकडेला लावून पाणी पीत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या विशाल आणि शहारुखने त्यांना कोयत्याचा धाक दाखवून बोटातील अंगठी आणि मोबाईल हिसकावून घेतला. त्यांनी तातडीने येऊन सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.