पुणे - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करून अनेकांना तुरुंगात डांबले. त्यांच्या विरोधात खोटे पुरावे तयार केले. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत पराभव करा, असे आवाहन मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले आरोपी समीर कुलकर्णी यांनी केले. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
धर्माच्या आधारे समाजात फूट पाडणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करा - समीर कुलकर्णी - राष्ट्रवादी काँग्रेस
धर्माच्या आधारे समाजात फूट पाडणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करा, असे आवाहन हिंदू दहशतवादाच्या आरोपात तुरुंगवास भोगलेल्या आरोपीने केले आहे.
मालेगाव प्रकरणात वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडल्यानंतर ५ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. हैद्राबाद येथील मक्का मस्जिद बॉम्बस्फोट आणि समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटातील आरोपींना निर्दोष ठरवताना न्यायालयाने तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले आहे. त्यामुळे भारतीय समाजात धर्माच्या आधारे फूट पाडणाऱ्या तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करा. राष्ट्रभक्त नागरिकांनी एकजुटीने या अभद्र गठबंधनाला सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले. तसेच तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करून पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राला आयते कोलीत हाती दिले, असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींचा अतोनात छळ करण्यात आला. कालांतराने तपास झाल्यानंतर आरोपीचे निर्दोषत्व सरकारच्याही लक्षात आले. त्यामुळे तपासाचा तपशील आरोपपत्रात समाविष्ट न करता काही निष्पाप तरुणांचे चित्र हिंदू दहशतवादी म्हणून रंगविण्यात आल्याचा आरोपही कुलकर्णी यांनी यावेळी केला.