पुणे Sambhaji Raje On Prakash Ambedkar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वराज्य आणि वंचित बहुजन आघडीमध्ये युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता खुद्द स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी खुलासा केला आहे. आमची आणि वंचित बहुजन आघाडीची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. प्रकाश आंबेडकर हे वरिष्ठ नेते आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. मात्र औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिल्यानंतर ही युती होणं शक्य नसल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे स्वराज्य पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे.
औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिल्यानं फिस्कटली युती :राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि स्वराज्य पक्षातील युतीच्या चर्चानं राजकारण ढवळून निघालं होतं. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी दौलताबाद इथं जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून चादर चढवली. त्यामुळे या युतीचं 'घोडं' अडलं आहे. खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी त्याबाबत माहिती दिली. प्रकाश आंबेडकर हे विद्वान आहेत. त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरला त्यांनी औरंगजेब कबरीवर फुलं वाहिली, तेव्हा माझं मन वळलं आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं.
औरंगजेब शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू :प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवल्यानं प्रकाश आंबेडकर यांच्या 'वंचित' आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाची युती फिस्कटली आहे. शिवाजी महाराज यांचा सगळ्यात मोठा शत्रू औरंगजेब होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेब कबरीवर जाऊन फुलं वाहणं, याचं उत्तर त्यांनीच द्यावं, असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले. नाहीतर मी युतीसाठी गेलो असतो आणि चर्चा पुढे गेली असती. मात्र आता युती शक्य नसल्याचंही संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी स्पष्ट केलं. संभाजीराजे छत्रपती आज पुण्यात अजित पवार यांच्या भेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांनी याबाबत माहिती दिली.