पुणे- सारथी संस्थेच्या परिपत्रका विरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. पुण्यात सारथी संस्थेच्या अधिकाऱ्यांना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दालनात कोंडून ठेवले होते. सारथी संस्थेचे परिपत्रक मागे घेण्याची मागणी करत त्यांनी ही भूमिका घेतली होती. सरकारचं परिपत्रक मराठा समाजाच खच्चीकरण करणारे आहे. त्यामुळे हे परिपत्रक त्वरित रद्द करावे. अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा आणि खुर्च्या जाळण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
पुण्यात सारथीच्या अधिकाऱ्यांना दालनातच कोंडले.. सध्याचे सरकार मराठा समाजाच्या विरोधात आहे का? असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला आहे. तसेच या प्रकरणाची सरकारनं योग्य दखल घेतली नाही तर या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. या इशाऱ्याबाबतचे एक निवेदनही सारथी संस्थेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक भूमिकेनंतर दोन ते तीन दिवसात यावर सकारात्मक निर्णय होईल. कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन मिळाल्यानंतर ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांची सुटका केली. मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली. मात्र नोव्हेंबर महिन्यात सरकारने आदेश काढून विद्यार्थी स्टायफंड कोर्सेसच्या अनुदान खर्चास मनाई केली आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात संस्थेच्या कारभाराच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा आदेश दिल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच स्टायपेंड, शिष्यवृत्तीवरील निर्बंध उठवावं, एसीबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता त्वरित मिळण्याची मागणी केली.
काय आहे सारथी-
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था कंपनी कायदा, 2013 अंतर्गत कलम 8 अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी आणि आमच्या संस्थेमध्ये जोरदार क्षेत्रांचा समावेश आहे, संशोधन, सरकारची धोरणे, प्रशिक्षण इ. आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन, विशेषत: जे शेतकरी शेतीवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी मार्गदर्शन करते.