पुणे -येथील पिंपरी-चिंचवडच्या सेंट जोसेफ शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी जुना पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या घोराडेश्वर डोंगरावर जाऊन स्वच्छता मोहीम राबवली. या विद्यार्थ्यांनी ही मोहीम राबवत संपूर्ण डोंगर परिसर स्वच्छ केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सेंट जोसेफ या शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी पांडवकालीन घोरडेश्वर डोंगरावर स्वछता राबवली. या डोंगरावर महाभारतातील पांडवांनी एक दिवस आणि रात्र वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. ते आपल्या जुन्या वास्तू जपत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच येथे महादेवाचेही एक मंदिर आहे, त्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. अनेक नागरिक, तरुण-तरुणी ट्रेकिंगसाठीही येतात त्यामुळे डोंगरावर प्लास्टिक आणि कागदाचा मोठा प्रमाणात कचरा जमा होतो. या सर्व परिसराची स्वच्छता सेंट जोसेफच्या विद्यार्थ्यांनी ही मोहीम राबवून केली आहे. यात पाण्याची टाकीची साफसफाई, कागद, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या आदि सर्व कचरा श्रमदान करून एका जागी जमा करून नंतर नष्ट करण्यात आला.