पुणे- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातील ऐतिहासिक वास्तुचे गडकिल्ल्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था दुर्गसंवर्धनाचे काम करत आहेत. त्यामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानचे नाव अग्रभागी येते. आता सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने दुर्गसेवकांनी गेल्या 12 वर्षात केलेल्या दुर्गसंवर्धनाच्या कार्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला जाणार आहे. या माध्यमातून स्वराज्यातील गडकिल्ले जतन करण्यासाठी अनेक हात पुढे यावेत या उद्देशाने प्रतिष्ठानने 3 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आले आहे.
सह्याद्रीची यशोगाथा हा कार्यक्रम दिनांक 8 ते 10 मार्च 2020 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत पुण्यातील बालगंधर्व कला दालनात सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याचा लेखाजोखा जाणून घेण्यासाठी व त्याच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थिती लावावी, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
सह्याद्रीची यशोगाथा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने दुर्गसंवर्धन म्हणजे काय? काय केले जाते या संवर्धन मोहिमेत.. स्वराज्यातील गडकिल्ले जतन करण्यासाठी पुढे आणखी कोणकोणत्या मोहिमा हाती घेण्यात येणार आहेत. या बद्दलची माहिती दिली जाणार आहे. तसेच गेल्या 12 वर्षात सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे कोण-कोणत्या ठिकाणी दुर्गसंवर्धनाचे कार्य केले आहे. त्यामध्ये त्यांना कशा प्रकारच्या अडचणी आल्या. या मोहिमेमागील त्यांचा हेतू काय? प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कोणत्या अडचणी येऊ शकतात.. त्यांची परवानगी कशी मिळवली जाते.. तसेच दुर्गसंवर्धना बरोबरच पर्यटन विकास कसा साधता येईल या बाबतची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने दुर्गसंवर्धन हाच मुख्य हेतू कसा पूर्णत्वास जाईल याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आज पर्यंत केलेल्या कामाची व पुढील नियोजित मोहिमांच्या उद्देशाच्या प्रतिकृती तुम्हाला या कार्यक्रमस्थळी पाहायला मिळणार आहेत. यामध्ये किल्ले हडसरचे प्रवेशद्वार प्रतिकृती, पद्मदुर्गावरचा भगवा ध्वज, किल्ले कन्हेरगडावरील 100 फूट उभ्या कातळकड्यात पायऱ्या कोरून गडावर जाण्याचा मार्ग सोपा कशा प्रकारे करण्यात आला. यासह किल्ले जंजीरा, किल्ले रोहिडा यासारख्या अन्य किल्ल्यासह तोफगाडे, ध्वज, यांच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून कार्याचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे.
दुर्गसंवर्धानच्या चळवळीत महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी सहभाग घ्यावा, प्रत्येकाला याची जाणीव व्हावी, किल्ले संवर्धनाची ही चळवळ लोकचळवळ व्हावी या उद्देशाने या क्रार्यक्रमाला उपस्थिती लावण्याचे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.