बारामती (पुणे) - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा कट रचणे, वेळोवेळी प्रक्षोभक वक्तव्य करून सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांची वकिली सनद रद्द करण्याची मागणी (Gunratna Sadavarte Bar Charter revocation) बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव (RTI Activist Nitin Yadav on Gunratna Sadavarte) यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांची वकिली सनद रद्द करण्यासंबंधी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलला तसे निवेदन दिले आहे. आपल्या वकिली सनदेचा गैरवापर करत असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे. सदावर्ते यांच्याविरोधात मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोट अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द करावी - शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर नुकताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वकिली सनदेचा गैरवापर करत ते वेळोवेळी प्रक्षोभक वक्तव्य करत सामाजिक शांतता भंग करत असल्यामुळे त्यांची वकिलीची सनद रद्द करावी, अशी मागणी यादव यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.