पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित केले जाईल. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशी विरोधकांची भूमिका आहे. तर दुसरीकडे शरद पवार देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
कुणीही राजकारण करू नये :या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. 'शरद पवार यांच्या या कार्यक्रमाला जाण्याने कुठलाही संभ्रम निर्माण होत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यानुसार सामाजिक कार्यक्रमाला जात असताना कुणीही राजकारण करू नये', अशी त्यांची भूमिका असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच कोणी कितीही बोललं तरी शरद पवार या कार्यक्रमाला जाणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
तरुणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा : रोहित पवार पुढे म्हणाले की, या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आमचे सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील भाषण होईल. सध्या राज्यात ट्रीपल इंजिन सरकार असल्याने, कार्यक्रमात काही घोषणा होऊन तरुणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच मणिपूर घटनेच्या संदर्भात मी शरद पवारांना मोदींशी चर्चा करण्याची विनंती करणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.