पुणे Rohit Pawar Reply To Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (1 डिसेंबर) कर्जत येथील पक्षाच्या राज्यव्यापी शिबिरात केलेल्या भाषणात अनेक गौप्यस्फोट करत राजकीय खळबळ उडवून दिली. तसंच यावेळी त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांवरही जोरदार टोलेबाजी केली. यावेळी अजित पवारांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर टीकास्त्र सोडलं. दरम्यान, आम्ही एसीमध्ये बसून भाषण करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन समस्या जाणून घेतो, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले रोहित पवार :दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यावरून निघालेली रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा येत्या 12 डिसेंबरला नागपूरला धडकणार आहे. या यात्रेवरून अजित पवार यांनी टीका केली होती. त्यालाच उत्तर देत रोहित पवार म्हणाले की, काही लोक म्हणतात आम्ही काय संघर्ष पाहिला? बरोबर आमचा संघर्ष काहीच नाही. पण या महाराष्ट्रात बेरोजगार सुशिक्षित युवा आहे, त्यांचा संघर्ष खरा आहे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा हमीभावाचा संघर्ष आहे, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या भावाचा संघर्ष आहे, रोजच्या वाढत्या महागाईचा संघर्ष आहे, शिक्षण घेऊन नीट जगताही येत नाही असा सर्वसामान्यांचा वेगवेगळा संघर्ष आहे. तसंच या संघर्षापुढं आमचा संघर्ष काहीच नाही.