रोहित पवारांसोबत खास संवाद पुणे : Cricket World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. यंदाचा विश्वचषक भारतात होतोय. राज्यात वर्ल्डकपचे दहा सामने होणार असून, त्यातील पाच सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर होतील. विशेष म्हणजे, तब्बल २७ वर्षानंतर पुण्यात वर्ल्डकपच्या सामन्यांचं आयोजन होणार आहे.
गहुंजे स्टेडियमवर अत्याधुनिक ड्रेनची व्यवस्था :क्रिकेट सामन्यांना बऱ्याचवेळा पावसाचा मोठा फटका बसतो. या आधी पावसामुळे अनेक महत्वाचे सामने पूर्ण न झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर ही समस्या निर्माण होणार नाही. या स्टेडियमवर ड्रेनेजची अशी व्यवस्था करण्यात आली आहे की, कितीही पाऊस झाला तरी पुढील ४५ मिनिटात सामना पुन्हा सुरू होईल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी ही माहिती दिली.
१५ तारखेपर्यंत स्टेडियम सज्ज असेल : यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, विश्वचषकच्या सर्व सामन्यांची तयारी पूर्ण झाली आहे. स्टेडियमची क्षमता ३८ हजार लोकांची असून, पार्किंगसाठी ४५ हजार लोकांच्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. येणाऱ्या प्रेक्षकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसंच स्टेडियमच्या आत ४ मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत. ही सर्व कामं पूर्ण होत असून, येत्या १५ तारखेपर्यंत स्टेडियम वर्ल्डकपच्या सामन्यांसाठी सज्ज असेल, असं रोहित पवार यांनी नमूद केलं.
प्रेक्षकांना सामन्याच्या २ तास आधी येण्याचं आवाहन : रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, वर्ल्डकपच्या सामन्यासाठी २ हजार कर्मचारी तैनात असतील, जे येणाऱ्या प्रेक्षकांसाठी विविध सोयी सुविधांची काळजी घेतील. आम्ही आयसीसीआयला आणि बीसीसीआयला मनापासून धन्यवाद देतो की, त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर ५ सामने आयोजित करण्याची संधी दिली. हे सामने अतिशय चांगल्या वातावरणात होणार आहेत. येणाऱ्या प्रेक्षकांना आवाहन आहे की, त्यांनी सामना पाहण्यासाठी २ तास आधी यावं जेणेकरून त्यांना सामन्याचा पुरेपूर आनंद घेता येईल, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा :
- Asian Games २०२३ : रँकीरेड्डी-शेट्टी जोडीची ऐतिहासिक कामगिरी, आशियाई गेम्समध्ये जिंकलं पहिलं सुवर्णपदक
- Asian Games २०२३ : चक दे इंडिया! आशियाई स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी, अंतिम सामन्यात जपानचा धुव्वा उडवला
- Cricket World Cup 2023 : 'राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय, तो प्रत्येक सामना गांभीर्यानं घेतो'; धोनीच्या बालपणीच्या मित्राची 'ईटीव्ही भारत'ला खास मुलाखत