पुणे : सध्या गेल्या वर्षावर नजर टाकली तर सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली असून गुन्ह्यांचे प्रकार बदललेत. सोशल मीडियाचा वापर करून फसवणूक सहज आणि सोप्या पद्धतीने केली जात आहे. अशीच एक सायबर क्राईमची घटना पुण्यात घडली आहे. फेसबुकच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करून त्यांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. महिलेला गिफ्ट पार्सल पाठवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या परदेशी टोळीतील नायजेरियनला सायबर पोलिसांनी दिल्लीत बेड्या ठोकल्या आहेत.
७ डेबिट कार्डसह इतर साहित्य जप्त :अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रॉबिनहूड ओकोह (वय ३९, रा. दिल्ली) असे असून याला सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. हा आरोपी मुळचा नायजेरियाचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून ४ मोबाईल, १ हार्डडिस्क, २ पेनड्राईव्ह, १५ सीमकार्ड, ७ डेबिड कार्डसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याला न्यायालात हजर केले असता 28 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे परदेशी टोळीतील सायबर चोरटे फेसबुकद्वारे विविध महिलांना फ्रेन्डरिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री करण्याच्या प्रकणामध्ये वाढ झाली आहे. मैत्री करतांना आरोपी अमेरिका, लंडन इत्यादी देशातील असल्याचे भासवून स्वत: डॉक्टर किंवा पायलट असल्याची बतावणी करतात. मग त्या महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर काही दिवसांनी ते मौल्यवान पार्सल (दागिने, पैसे ईत्यादी) पाठवित असल्याचे सांगतात. त्यांनतर हजारो रुपयांची फसवणूक करतात.