लोणावळा(पुणे) - लोणावळ्यात डाॅक्टरच्या घरावर मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये पन्नास लाख रुपये रोख व सोळा लाख किमतीचे दागिने असा एकूण 66 लाखांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळवला आहे. डॉ. हिरालाल खंडेलवाल हे बालरोग तज्ज्ञ असून राहात असलेल्या बंगल्यातच त्यांचं रुग्णालय आहे.
लोणावळ्यात डॉक्टर दाम्पत्याच्या घरी दरोडा - एकूण 66 लाखांचा मुद्देमाल लंपास -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोनच्या सुमारास हा दरोडा पडला. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लायडिंगची खिडकी खोलून सहा जण धारदार शस्त्रांसह घरात शिरले. तर अन्य काही जण घराबाहेर थांबले होते. डाॅक्टर खंडेलवाल यांच्या बेडरुमचा दरवाजा उघडा असल्याने दरोडेखोरांनी थेट घरात प्रवेश केला. डाॅक्टर खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देऊन हातपात बांधत घरातील सर्व रोख रक्कम व सोनं असा ऐवज लुटला.
साधारण अर्धा तासाहून अधिक काळ दरोडेखोर घरात होते. यानंतर गच्चीवरून बेडशीट बांधत ते खाली उतरले व पसार झाले. घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. या घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली आहे.