पुणे - आज दुपारच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटात वेळखिंडी जवळ करंजाळे गावाच्या हद्दीत रस्ता खचून रस्त्याला तडे गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओतूर पोलिसांनी या मार्गावरून अवजड वाहतूक बंद केली आहे.
नगर-कल्याण महामार्गावर वेळखिंडीत रस्ता खचला; माळशेज घाटातून अवजड वाहतूक बंद - माळशेज घाटात अनेक दुर्घटना
आज दुपारच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटात वेळखिंडी जवळ करंजाळे गावाच्या हद्दीत रस्ता खचून रस्त्याला तडे गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओतूर पोलिसांनी या मार्गावरून अवजड वाहतूक बंद केली आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. पावसाळ्यात माळशेज घाटात अनेक दुर्घटना घडतात. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्ता खचण्याचा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, सध्या पावसाचा जोर कायम असल्याने उपाययोजना करण्यासही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी या मार्गावरुन प्रवास करुन नये. त्याऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.
नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटमार्गे मुंबईच्या दिशेने मोठी वाहतूक केली जाते. प्रामुख्याने शेतकरी आपला शेतमाल या मार्गाने कल्याण, वाशी, मुंबई परिसरात घेऊन जात असतात. माळशेज घाटातील धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतूक करणाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी सूचना वाहतूक पोलिसांनी दिली आहे.