पुणे - कोरोनामुळे जग दुःख आणि वेदनांच्या खाईत लोटले गेले आहे. यात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. पुण्यातल्या एका रिक्षावाल्याच्या वडिलांचाही मृत्यू झाला. पण, या कष्टकऱ्याने दुःखातही सामाजिक दायित्वाचा वसा सोडलेला नाही. भवानी पेठेतील अक्षय कोठावळे हा तरुण गर्भवती महिला व गरजू लोकांना मोफत रिक्षासेवा देत आहे. कोणालाही रुग्णवाहिका उपलब्ध होत नसेल तेव्हा, अक्षय रिक्षासेवा उपलब्ध करून लोकांची मदत करत आहे.
भवानी पेठेतील अक्षय कोठावळेच्या वडिलांना वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचा 18 मे रोजी मृत्यू झाला. मात्र, अक्षयने व्यवस्थेला दोष न देता जी परिस्थिती आज माझ्यावर ओढली गेली आहे ती दुसऱ्यावर येऊ नये म्हणून त्याने आपली रिक्षा अत्यावश्यक सेवेसाठी सुरू केली. पुण्यातील भवानी पेठ हा कोरोनाचा सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट ठरलेला परिसर आहे. या ठिकाणी रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत होते. पेठेमध्ये पत्रे लावल्यामुळे रुग्णवाहिकाही येण्यास अडचणी येत होत्या. अशावेळी अक्षय हा आपल्या रिक्षातून या रुग्णांना रुग्णालयात ने-आण करत होता. या व्यतिरिक्त गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक अशा लोकांनाही रुग्णालयात ने-आण करण्याचे त्याचे काम सुरू आहे. पुण्यात प्लेगच्या साथीत सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा केली होती. सेवा करत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याच गोष्टींचा आदर्श घेत मी ही सेवा सुरू केली आहे, असे अक्षय कोठावळे सांगतो.