बारामती - शहरात वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ५ मे पासून पुढील सात दिवस टाळेबंदी घोषित केली आहे. त्यानुसार शहरातील चारही सीमा बॅरिकेट लावून बंद केल्या आहेत. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, ठीक ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही रुग्ण संख्या अपेक्षितरित्या कमी होत नसल्याचे चित्र आहे.
शासकीय रुग्णालयातील बेडची परिस्थिती -
बारामतीत कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी ३ शासकीय व ३८ खासगी रुग्णालय सेवेत आहेत. ग्रामीण रुग्णालय रुई, सिल्वर जुबली रुग्णालय, नर्सिंग स्कूल या तीन शासकीय रुग्णालयात एकूण २८६ बेड उपलब्ध आहेत. यामध्ये १७७ ऑक्सिजन बेडची क्षमता आहे. मात्र, २०४ रुग्ण उपचार घेत आहेत. नर्सिंग स्कूल वगळता वरील दोन रुग्णालयात २२ व्हेंटिलेटर उपलब्ध असून या सर्व बेडवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या तीनही रुग्णालयात ऑक्सिजन नसलेले १०६ बेड आहेत. मात्र ३३२ रुग्ण उपचार घेत आहेत.
खासगी रुग्णालयातील बेडची परिस्थिती -
बारामतीत कोविड रुग्णांसाठी ३८ खासगी रुग्णालयातील एकूण १३३१ बेड पैकी ८० टक्के म्हणजे ११०४ बेड कोविड रुग्णांसाठी आहेत. यामध्ये एकूण ऑक्सिजन बेड ६१८ आहेत. पैकी ५८१ बेडवर रुग्ण अॅडमिट असून ३७ बेड रिक्त आहेत. एकूण १०३ आय.सी.यू बेड पैकी ९७ बेडवर रुग्णांवर उपचार सुरू असून ६ बेड रिक्त आहेत. व्हेंटिलेटर बेडची संख्या ७८ असून ७८ रुग्ण उपचार घेत आहेत. या ३८ खासगी रुग्णालयात ऑक्सिजन नसलेल्या बेडची संख्या ५२५ असून पैकी ४७३ रुग्ण उपचार घेत असून ५२ बेड रिक्त आहेत.