पुणे - महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पुणे शहराकडे पाहिले जाते. पुणे लोकसभा मतदारसंघ तसा मिश्र नागरी वस्तीचा शहरी मतदारसंघ आहे, झोपडपट्टीपासून उच्चभ्रू वस्तीपर्यंत सर्वच स्तरातील मतदार या मतदारसंघात सामावलेले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे ८ मतदारसंघ आहेत वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कँटोन्मेंट, हडपसर, कसबा पेठ आणि खडकवासला असे हे विधानसभा मतदारसंघ आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा पुण्यात १९५१ पासून २००९ पर्यंत झालेल्या १४ लोकसभा निवडणुकांमध्ये मतदार हा सातत्याने काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला होता. या मतदारसंघात १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अण्णा जोशी विजय झाले होते. १९९९ च्या निवडणुकीत प्रदीप रावत यांनी भाजपसाठी विजयश्री खेचून आणला होता, मात्र पुन्हा काँग्रेसकडे हा मतदारसंघ गेला. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपचा विजय झाला. एकेकाळी काँग्रेसचा गड राहिलेला पुणे लोकसभा मतदारसंघ आता भाजपचा गड म्हणून ओळखला जात आहे. गेल्या ५ वर्षात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे भाजपची पुणे शहरावर चांगली पकड बसली आहे, या १६ व्या लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच सरळ लढत दिसून येते आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात २०१४ ला भाजपला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत उमेदवारांना पडलेली मते
भाजप -– अनिल शिरोळे : ५ लाख ६९ हजार ८२५
काँग्रेस -–विश्वजित कदम : २ लाख ५४ हजार ५६
मनसे - दीपक पायगुडे : ९३ हजार ५०२
आप - सुभाष वारे - २८ हजार ६५७
भाजपचे अनिल शिरोळे ३ लाख १५ हजार ७६९ इतक्या विक्रमी मताधिक्क्याने विजयी झाले होते. त्यांना आठही विधानसभा मतदारसंघातून जोरदार लीड मिळाला होता.
२०१४ नंतरच्या निवडणुकात भाजपने विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले होते. पुणे लोकसभा मतदारसंघातील या निवडणुकीवर परिणाम करणारे घटक..
१) पायाभूत सुविधा - वाहतूक, कचऱ्याचे व्यवस्थापन, पर्यावरण, पाणी विषयक समस्या
२) फसलेली नोटबंदी, वाढती महागाई
३) जातीय समीकरणे - मराठा, ब्राह्मण हे घटक महत्वाचे
सध्या मोदींची लाट ओसरली असली तरी जनतेच्या अपेक्षा कायम आहेत. पुण्यात मेट्रो, स्मार्ट सिटी, नदी सुधार, नवीन विमानतळ आदी प्रकल्पांच्या कामाला गती आली आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असून मतदारसंघात भाजपचे पक्ष संघटन मजबूत आहे. विरोधकांच्या पक्षात अंतर्गत कलह आहे. विरोधकांकडे तुल्यबळ उमेदवार नसले तरी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना सध्या मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे मोहन जोशी हे जोर लावताना दिसतात दुसरीकडे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. तसेच शिवसेनेकडून त्यांना चांगली साथ मिळत असल्याने सध्या या परिस्थितीमध्ये गिरीश बापट हे उजवे ठरत आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात सध्या २० लाख ७४ हजार एवढे मतदान आहे. यामध्ये नव्याने ३ लाख मतदारांचा समावेश झालेला आहे. मतदारांमध्ये युवकांचा समावेश हा लक्षणीय दिसून येत आहे. यात ६ लाखांपेक्षाही जास्त तरुण मतदार आहेत. हा तरुण मतदार भाजपकडे मोठ्या प्रमाणात ओढल्या गेल्याचे काही निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे सध्या तरी पुणे शहरात भाजपचे पारडे जड आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात अर्ज माघारीनंतर आता ३१ उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या १२ उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे पुण्याची लढत ही ३१ उमेदवारांत होणार आहे. यामध्ये १६ अपक्ष उमेदवार आहेत. युतीचे उमेदवार गिरीश बापट, काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी, वंचित बहुजन आघाडीचे अनिल नारायण शिंदे या प्रमुख उमेदवारांसह ३१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील १६ अपक्ष असून इतर विविध लहान-मोठ्या पक्षाचे उमेदवार आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून एकूण ४६ उमेदवारांनी ५९ अर्ज दाखल केले होते. छाननीमध्ये ३ अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १२ इच्छुकांनी माघार घेतली.