पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या या बालेकिल्ल्यात पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे तर शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे दुसऱ्यांदा मैदानात उतरलेत. ही लढत अत्यंत अतितटीची मानली जात आहे.
लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नव्याने तयार झालेला मावळ लोकसभा मतदारसंघ २०१९ ला तिसऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहे. पुणे जिल्ह्यातील ३ आणि रायगड जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघांना एकत्र करून नव्याने तयार झालेला हा मतदार संघ आहे. राजकीय, ऐतिहासिक आणि भौगोलिक विविधतेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ. आतापर्यंत झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये इथे शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने तिसऱ्या वेळीही बाजी मारत हॅट्रिक साधायचा प्रयत्न शिवसेना करत आहे. राष्ट्रवादी ही जागा स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे.
पक्षीय बलाबल
मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत या ३ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. हा मतदारसंघ अर्धे पुणे आणि अर्धे कोकण असे प्रतिनिधित्व करणारा मतदारसंघ आहे.
1) पिंपरी - गौतम चाबूकस्वार (शिवसेना)
2) चिंचवड - लक्ष्मण जगताप (भाजप)
3) मावळ - बाळा भेगडे (भाजप)
4) पनवेल - प्रशांत ठाकूर (भाजप)
5) उरण - मनोहर भोईर (शिवसेना)
6) कर्जत - सुरेश लाड (राष्ट्रवादी)
मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नव्याने तयार झालेल्या या मतदारसंघाने पहिली निवडणूक पाहिली ती २००९ मध्ये. या निवडणुकीत लढत झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आझम पानसरे आणि शिवसेनेच्या गजानन बाबर यांच्यात. त्यात बाबर यांनी तब्ब्ल ८० हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला. बाबर यांना ३ लाख ६४ हजार ८५७ मते मिळाली. तर पानसरे यांना २ लाख ८४ हजार २३८ मते मिळाली. २०१४ मध्येही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगेल अशी चिन्हं होती. पण ऐनवेळी लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करत शेतकरी कामगार पक्षात उडी घेतली आणि राष्ट्रवादीला शेवटच्या क्षणी उमेदवार शोधण्यासाठी धावा धाव करावी लागली. अखेर राहुल नार्वेकर यांना बळीचा बकरा करत राष्ट्रवादीने उमेदवार शोधला. तर शिवसेनेकडून पुन्हा गजानन बाबर यांना संधी मिळेल असे वाटत असताना अखेरच्या क्षणी श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाली.