पुणे -मुलावर सून आणि तिच्या आईवडिलांनी करणी केल्याचा आरोप एका स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. या प्रकरणी संबंधित निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने न्यायालयात धाव घेऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चतुशृंगी पोलीस ठाण्यात सुनेसह 10 जणांविरुद्ध गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.
सुनेची मुलावर करणी , गुन्हा दाखल करण्यासाठी निवृत्त पोलिसाची न्यायालयात धाव - निवृत्त पोलिसाची अंधश्रद्धा
विवाह झाल्यानंतर सून, तिचे आईवडील आणि इतरांनी त्यांच्या म्हणण्यानुसार वागावे, यासाठी काळे यांच्या मुलाला एका मांत्रिक महिलेकडे नेऊन त्याच्यावर करणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सून अपर्णा नितीन काळे (वय 27), अशोक बापूराव डुकरे (वय 56), चंद्राक्षी अशोक डुकरे (वय 52), कविता मोहन धोत्रे (वय 32), तनुजा दत्ता शिंदे (वय 34), समीर अशोक डुकरे (वय 38), मोहन नामदेव धोत्रे ((वय 35) आणि इतर तीन अशा 10 जणांवर भादंवि कलम 406, 420, 389, 120 (ब), 34 सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध अधिनियम 2013 चे कलम 2 (1), (बी)(7) सह 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निवृत्त पोलीस निरीक्षक मसाजी काळे (वय 58) यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मांत्रिक महिलेकडे नेल्याचा आरोप-
याप्रकरणाची अधिक माहिती अशी की, तक्रारदार काळे दोन वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस दलातून पोलीस निरीक्षक पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. 2017 साली त्यांच्या मुलाचा अपर्णा यांच्याशी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर सून, तिचे आईवडील आणि इतरांनी त्यांच्या म्हणण्यानुसार वागावे, यासाठी काळे यांच्या मुलाला एका मांत्रिक महिलेकडे नेऊन त्याच्यावर करणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याशिवाय सुनेच्या कुटुंबीयांनी समाजाच्या वधू-वर केंद्रात खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचेही त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी मसाजी काळे यांनी सुरुवातीला पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर यात तथ्य न आढळल्यामुळे गुन्हा दाखल केले नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर काळे यांनी न्यायालयात अर्ज केला. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणात दाखल करावे आणि चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश पोलिसांना दिले आहेत.