पुणे :पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी सापळा रचून काळाबाजार करणाऱ्या टोळीचे बिंग फोडले आहे. या प्रकरणात वेगवेगळ्या रूग्णालयात काम करणाऱ्या चार वॉर्ड बॉईजला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून तीन रेमडेसीवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी एकूण 40 इंजेक्शनची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकरा ते पंधरा हजार रूपयांना त्यांनी ही विक्री केली.
रेमडेसीवीरचा काळाबाजार केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली कोरोनाने मृत झालेल्या रूग्णाच्या नावाने किंवा एखाद्या कोरोनाबाधिताला रेमडेसीवीरची गरज नसताना त्याच्या नावाने इंजेक्शन घेऊन हा काळाबाजार केला जात होता. यातील आरोपी मुरलीधर मारुटकर हा बाणेर कोवीड सेंटर, अजय मोराळे हा औंधच्या मेडी पॉईंट हॉस्पिटलमध्ये, प्रताप जाधवर हा तळेगावच्या मायमर हॉस्पिटलमध्ये तर आदित्य मैदरगी हा सांगवीच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. हे सर्व रूग्णालय शासनाकडून चालवले जातात. त्यामुळे यात प्रशासनाचा ही हात आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
पुण्यात इंजेक्शनची रिटेल विक्री बंद केल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली रेमडेसीवीर इंजेक्शनची रिटेल विक्री बंद; विभागीय आयुक्तांची माहिती
रेमडेसीवीरची गरज असलेल्या रूग्णांना रूग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध होईल. या इंजेक्शनची रिटेल विक्री बंद करण्यात आल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. खासगी व्यक्तीला औषध दुकानांवर यापुढे रेमडेसीवीर इंजेक्शनची खरेदी करता येणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात रेमडेसीवीरची निर्माण झालेली टंचाई ही काही प्रमाणात कृत्रीम आहे. या इंजेक्शनची मागणी आणि पुरवठ्याचे नियोजन केल्यास ही टंचाई राहणार नाही. रेमडेसीवीर इंजेक्शनच्या मागणीचे नियोजन करणे आणि पुरवठा नियंत्रित करणे, असा दोन सूत्री कार्यक्रम आखला आहे. याबाबत खासगी रूग्णालयातील डॉक्टरांशी बोलून ज्या रूग्णांना गरज असेल त्यांनाच हे इंजेक्शन लिहून द्यावे, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
हेही वाचा -लॉकडाऊनसंदर्भात टास्क फोर्सची आज महत्वाची बैठक, काय निर्णय होणार याकडे राज्याचे लक्ष