पुणे :सध्या कमी वेळेत आणि मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचे स्रोत आणि तरुण तरुणीच्या पसंतीस पडलेले विषय म्हणजे प्री-वेडिंग शूटिंग. सध्या मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणींमध्ये लग्नाच्या आधी प्री-वेडिंग शूटिंग केले जाते. लग्नात जेवढा खर्च केला जात नाही त्यापेक्षा जास्त खर्च या प्री-वेडिंग शूटिंगवर केला जात आहे. पण आता याच प्री-वेडिंग शूटिंग बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सुरवातीला मारवाडी समाज, मग पद्मशाली समाज आणि त्यानंतर मराठा समाजाच्या वतीने प्री-वेडिंग शूटिंगवर बंदी घालावी ही मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एकविसाव्या शतकात देखील जातपंचायतीला पुढे केले जात असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचे सांगितले जात आहे.
का आली प्री-वेडिंग शूटिंगवर बंदी : जेव्हा एखाद्या तरुण तरुणीचे लग्न ठरते तेव्हा त्या वेळेस लग्नाच्या आधी मोठा खर्च करून प्री-वेडिंग फोटोशूट केले जाते. याच प्री-वेडिंग च्या काळात या जोडप्यात भांडण झाले की, ती तरुण किंवा तरुणी घरी परतल्यावर घरच्यांना लग्न मोडण्यासाठी सांगतात. अशा घटना सध्या वाढत आहेत. तसेच प्री-वेडिंग केल्यावर जर लग्न मोडलं तर त्या तरुणीला ब्लॅकमेल देखील केले जात असल्याच्या घटना सध्या समाजात घडत आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्या पद्धतीने प्री-वेडिंगशूट केले जाते आणि लग्नाच्या आधी दाखवल जाते, ते आपल्या संस्कृतीला न शोभणारे आहे. म्हणून प्री-वेडिंगवर बंदी घालण्याचा प्रस्त्वाव आमच्या समाजाने मांडला आहे, असे यावेळी मारवाडी समाजाचे प्रतिनिधी प्रवीण चोरबोले यांनी सांगितले.
मराठा सेवा संघाचा ठराव मंजूर : मध्यंतरी मराठा समाजातील मुला-मुलींचे विवाह करताना प्री-वेडिंग शूटिंग करू नये, असा ठराव मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मराठा वधू-वर मेळाव्यात करण्यात आला होता. या ठरावाला सर्व समाज बांधवांनी एकमताने मान्यता दिली आहे. या प्री-वेडिंगशूट मुळे गरीब मराठा समाजाच्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. दोन जणांचा अंतर्गत विषय असून त्याचे फोटो व्हायरल केले जातात. ते समाजाला न शोभणारे आहे. म्हणून मराठा सेवा संघाच्या वतीने बंदीची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती यावेळी माजी अध्यक्ष सचिन अडेकर यांनी दिली आहे.
कायदेशीर काय आहे बाबी : प्री-वेडिंग शूटिंग हे एक अभिव्यक्ती स्वतंत्र आहे. तो ज्या-त्या व्यक्ती तसेच संबंधित तरुण आणि तरुणीचा अधिकार आहे. यामुळे पैशाचा अपव्यय होतो. प्रत्यक्षात असे म्हणणे चुकीचे आहे कारण पैसा कुठे खर्च करायचा आणि कुठे नाही हा सर्वस्वी व्यक्तिगत प्रश्न आहे. दुसरा प्रश्न म्हणजे भारतीय संस्कृतीला धरून नाही. तसेच भारतीय संस्कृतीमध्ये असे कुठेच लिहिले नाही की प्री-वेडिंग म्हणजेच लग्नाच्या अगोदर भेटू नये व फोटो शूट करू नये. त्यामुळे कायद्यामधेही अशी कुठेही तरतूद नाही की, या कायद्यानेही याला बंदी घालता येणार नाही. तसेच अगोदरच तरूणी शूट करण्यासाठी ज्यावेळेस एकत्र राहतात, एकत्र भेटतात, त्यावेळेस ते एकमेकांना समजून शकतात. त्याचबरोबर एकत्र आल्याने एकमेकांची मते एकमेकांच्या आवडी निवडी कळतात. त्यामुळे ती एक संधी असते आपल्या जोडीदाराला ओळखण्याची. त्यामुळे प्री-वेडिंगशूट अयोग्य आहे असे कुठेच वाटत नाही. अश्या पद्धतीने बंदीची मागणी म्हणजे, एकविसाव्या शतकात देखील जात पंचायतीला आमंत्रण असल्याचे यावेळी वकील रुपाली वायकर यांनी म्हटले आहे.
प्री-वेडिंगशूट वैयक्तिक प्रश्न : याबाबत एक तरुणी म्हणून शर्मिला येवले म्हणाली की, प्री-वेडिंगशूट असावा की नाही, हा ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. परंतु आत्ताच्या सध्याच्या काळात जे काही शूट केले जात आहे. तेव्हा ते कुठेतरी मनाला खटकणारे आहे. तसेच शूट करताना कुठल्याही समाजाच्या भावना यामुळे दुखवू नये असे मला एक युवती म्हणून वाटते. प्री-वेडिंगला विरोध नाही आणि समर्थन नाही फक्त जी काही भूमिका आहे ती सगळ्यांच्या योग्यतेची असावी. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर काय करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु कुठे समाजाचा विचार करून समाज काय बघत आहे, यामुळे समजाच्या भावना दुखावणार नाही ना या गोष्टीचा विचार करायला हवा असे शर्मिला येवले म्हणाली.