बारामती (पुणे) -दिवाळीनिमित्त झारगडवाडी येथीत तरुणांनी राजगड किल्ल्याची भव्य अशी 30 फूट लांबीची प्रतिकृती साकारली आहे. हा किल्ला पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत.
दिवाळीनिमित्त सर्वांनाच किल्ले बनवण्याचे आकर्षण असते, त्याचप्रमाणे बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील दुर्गप्रेमी असणाऱ्या काही तरुणांनी राजगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती उभारली आहे. प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये असणारे अनेक बारकावे त्यामध्ये पद्मावती तलाव, चोर दरवाजा, रामेश्वर मंदिर, पद्मावती माची, उद्धस्त वास्तू, दीपमाळ, तळघर कचेरी, दारुगोळा कोठार, धान्य कोठार, सदर तोफ यासारख्या गोष्टी हुबेहूब साकारण्यात आल्या आहेत. हा किल्ला तीस फूट लांब, दहा फूट रुंद व पाच फूट उंचीचा तयार करण्यात आला आहे. या किल्ल्यावरून व्यक्तींना सहज चालता येईल अशापद्धतीने या किल्ल्याची रचना करण्यात आली आहे.