पुणे(दौंड) - तालुक्यातील केडगाव येथील मोहन जनरल हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये काल (बुधवारी) चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन अभावी या रूग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे नेमका कशाने मृत्यू कशाने झाला याबाबत संभ्रम आहे.
दौंडमध्ये 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू; ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप - Daund oxygen crisis news
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. दौंड तालुक्यात ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तो कोरोनामुळे झाला की ऑक्सिजन अभावी याबाबत संभ्रम आहे.
नातेवाईकांनी रूग्णालयात गोंधळ घातल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यवत पोलिसांना पाचारण करावे लागले. या घटनेची माहिती मिळताच दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मृतांचे नातेवाईक आणि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. रूग्णांचा मृत्यू हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने झाला, असा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. रूग्णालय प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.