पुणे- भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंदोलनाचा संघर्ष पुन्हा सुरु केला आहे. शनिवारी जलवाहिनीच्या कामावर धरणग्रस्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. यावेळी जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भामा-आसखेड धरणग्रस्त 76 जणांवर मुंबई पोलीस कायदा कलम १३५ भारतीय दंड विधान कलम २७९,१८८ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची पोलीस हवालदार शेखर कुलकर्णी यांनी तक्रार दिली आहे.
भामा-आसखेड परिसरात जमावबंदी कायदा लागु करण्यात आला होता. तरी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंबेठाण येथील जलवाहिनीच्या कामावर आंदोलन केले. मात्र या आंदोलनात गर्दी जमवल्याचा ठपका ठेवत चाकण पोलीसांकडुन 76 धरणग्रस्त शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमच्या हक्काचे पुनर्वसन करा व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार जोपर्यत पुनर्वसन होत नाही तो पर्यत जलवाहिनीचे एक किलोमीटर काम बंद ठेवावे अशी मागणी घेऊन भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी आक्रमक होऊन आपल्या हक्काची लढाई लढत आहेत. मात्र हे आंदोलन चिरडण्यासाठी प्रशासन पोलीस बळाचा वापर करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. किती गुन्हे दाखल करा पण आम्ही आमचा लढा अजुन तिव्र करु, आता धरणाच्या पाण्यात कुटुंबासह जलसमाधी घेण्याची तयारी नागरिकांनी केली. गावागावांतील नागरिक दिवसभर पाण्यात बसुन होते. आता पोलीस बळाचा वापर करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास सामुदायिक जलसमाधी घेणार असल्याचे धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले.