खेड (पुणे) - तालुक्यातील कोरोना रुग्णांना आवश्यक असणारे रेमडिसिवीर इंजेक्शनसाठी अधिकृत विक्रेता नसल्याने या इंजेक्शनचा खेड तालुक्यात काळा बाजार होत आहे, रुग्णांना वाचविण्यासाठी नातेवाईक हे इंजेक्शन कोणत्याही भावात विकत घेत आहेत.
हे इंजेक्शन नक्की कुठे मिळते, असा सवाल रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. शासनाने आता हे इंजेक्शन रुग्णालयातच मिळणार असा आदेश जरी काढला असला तरी हा आदेश अजून कागदावरच आहे. त्यामुळे तालुक्यात या इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांकडे प्रशासन का डोळेझाक करत आहे? असा आरोप रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.
खेड तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे, तालुक्यात असलेले औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे कामगार वर्गाने कोरोनाचे नियम न पाळल्याने ही संख्येत झपाट्याने वाढत होत आहे. मात्र, या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशी आरोग्य यंत्रणा तालुक्यात कार्यान्वित नसल्याने अनेक रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
खेड तालुक्यातील रुग्णालयातील बेड संख्यानुसार तालुक्यातील 21 कोविड रुग्णालयात 144 रेमडेसिवीर इंजेक्शन ला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार त्या रुग्णालयात हे इंजेक्शन उपलब्ध करून देणार आहेत. सद्य परिस्थितीत रुग्णाच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लवकर या इंजेक्शनचा पुरवठा संबंधित रुग्णालयाला करण्यात येईल, अशी माहिती खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
सरकारी रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरली आहे. रुग्णांना यामुळे खासगी रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागत आहे. उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसीविर इंजेक्शनसाठी तालुक्यात कोणताही अधिकृत विक्रेता नेमण्यात आला नसल्याची बाब समोर आली आहे. हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी इतर तालुके किंवा पुणे शहरात धाव घ्यावी लागत आहे. ही त्या ठिकाणी इंजेक्शन उपलब्ध होत नाही म्हणून पर्याय नसल्याने अधिक किमतीत हे इंजेक्शन घ्यावे लागत आहे. सुमारे अकराशे रुपयांचे इंजेक्शन सहा हजारांला घ्यावे लागत असल्याने प्रशासनाने या इंजेक्शनसाठी अधिकृत विक्रेत्याची नेमणूक का केली नाही? हा प्रश्नही अनुत्तरित आहे.
तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दरदिवशी सरासरी 200ने वाढत आहे. तालुक्यात चांडोली ग्रामीण रुग्णालयात, म्हाळुंगे येथील म्हाडाच्या इमारतीमध्ये व आळंदी ग्रामीण रुग्णालयात सरकारी कोविड सेंटर तर यासह खासगी, असे 40 कोविड सेंटर आहेत. मात्र, तालुक्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेकांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
खेड तालुक्यात आतापर्यंत सुमारे 225 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही सतराशे पेक्षा अधिक रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 17 हजारांवर पोहोचली आहे.
खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहती लगतची गावे कोरोना हॉटस्पॉट क्षेत्र बनत आहे. यामुळे गावामध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणायचे स्थानिक प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.