पुणे- उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वत्र वळवाचा पाऊस पडताच मृगाचे मखमली किडे (राणी किडे) बाहेर पडले असून ते पाहण्याचा आनंद अनेकजण घेत आहेत. मृग नक्षत्र सुरू झाले की हे गर्द लाल रंगाचे किडे बाहेर पडतात. या किड्यांचे आयुष्य काही दिवसांपुरतेच असते. डोंगराळ भागात या किड्यांची संख्या जास्त आहे.
मृग नक्षत्रात येणाऱया या किड्यांचे अनेक शेतकरी रक्षण करतात. ज्यावर्षी हे किडे जास्त प्रमाणात असतात त्यावर्षी पाऊस मुबलक पडतो, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. यावर्षी मोसमी पाऊस उशिराने सुरू झाला असला तरी वळवाचा पाऊस गेल्या तीन दिवसांपासून पडत असल्याने मृग नक्षत्राचे किडे (लाल मखमली किडे)अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहेत.