पुणे -शहरात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना स्थिती अद्यापही बिकटच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील १०७ गावांमध्ये नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने या गावांची चिंता अधिक वाढली आहे.
जिल्ह्यातील गावांमध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा कोरोना रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली होती. या गावांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी तसेच या गावांमध्ये अधिक कडक निर्बंध करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत या गावांमधील सरपंच, ग्रामसेवक आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक आज जिल्हा परिषद पुणे येथे बोलाविली आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.
नव्याने कोरोना रुग्ण वाढत असलेल्या गावांमध्ये सर्वाधिक गावांची संख्या ही जुन्नर तालुक्यातील आहे. तर सर्वात कमी गावे ही वेल्हे तालुक्यातील आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेत वेल्हे तालुका पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वाधिक हॉट स्पॉट बनला होता. मात्र, योग्य नियोजन आणि उपयोजना केल्याने तालुक्यात कोरोनाला अटकाव घालण्यास प्रशासनाला यश मिळाले. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या अखेरीपासून ओसरण्यास सुरवात झाली. जून महिन्याच्या मध्यापर्यंत या दोन्ही शहरातील दुसरी लाट पुर्णपणे नियंत्रणात आली. परंतू याला पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग अपवाद ठरू लागला आहे. या दोन्ही शहरांच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रोजच्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या कायम जास्त राहू लागली आहे. ग्रामीण भागातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे पाहून, जिल्हा परिषदेने एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने मे आणि जून महिन्यातील गावनिहाय नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येचा अभ्यास केला. या अभ्यासातून ही बाब उघडकीस आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
रुग्ण वाढणाऱ्या तालुकानिहाय गावांची संख्या
आंबेगाव - ८, बारामती - ११, भोर - ५, जुन्नर -२१, खेड-१३, मावळ -११, मुळशी -७, पुरंदर -११, दौंड- ६, हवेली -१२, वेल्हे -०२
पुणे जिल्ह्यातील हॉट स्पॉट ठरलेल्या सर्व गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक व आरोग्य अधिकारी या सर्वांची बैठक घेण्यात येणार आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी हॉट स्पॉट असणाऱ्या गावांचे निर्बंध कडक करण्यात येणार आहेत. यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.