पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊन असतानाही काही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. त्यामुळे अशा विनाकारण फिरणाऱ्या 131 नागरिकांची आज (22 मे) रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. पोलीस आणि महानगरपालिका यांच्या सहकार्याने टेस्ट करण्यात येत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट, 14 जणांची थेट रुग्णालयात रवानगी 131 टेस्ट, 14 आढळले पॉझिटिव्ह
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना महामारी आटोक्यात येत आहे. मात्र, काही नागरिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचा फज्जा उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन असतानाही अनेकदा नागरिक बिनधास्त घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पोलिसांच्या सहकार्याने अशाच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची विविध भागात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. तेव्हा 131 पैकी 14 जण बाधित आढळले. त्यांना पुढील उपचारासाठी पिंपरीच्या जिजामाता रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, नागरिक बिनधास्त फिरत आहेत. कोरोनाला आटोक्यात आणायचा असल्यास नागरिकांनी नियमांचे पालन करने गरजेचे आहे, असेही आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा -उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत आघाडी सरकार उदासीन