पुणे - 'राज्यातील सरकार आम्ही पडणार नाही, हे सरकार अमर-अकबर-अँथनीचे सरकार आहे. ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडणार आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहोत,' असे भाजपचे नेते आणि केंद्रीय अन्न व पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. केंद्राने लागू केलेल्या कृषी विधेयकाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने दानवे यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
'राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी करत होते. आता तेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजाराची मदत करावी, असेही दानवे म्हणाले. केंद्राने आणलेले नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. पंतप्रधान मोदींनी जे निर्णय गेल्या सहा वर्षात घेतले ते काँग्रेस आणि विरोधकांना पचले नाहीत, म्हणून ते अपप्रचार करत आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे,' असे सांगत दानवे यांनी नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या कसे फायद्याचे आहेत, ते आम्ही जनतेला पटवून देऊ, असे म्हटले. काँग्रेस विरोधाला विरोध करत आहे. ते छोट्या शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, अशी टीकाही दानवे यांनी केली.
हेही वाचा -'नाणार नको, सी वर्ल्ड नको, आयुर्वेदिक वनस्पती संशोधन केंद्र नको, मग सेनेला कोकणात हवे तरी काय?'