बारामती - तरुणाला वेळोवेळी चाकूचा धाक दाखवत आम्ही बारामतीचे डॉन आहोत 'तू एक लाख रुपये दे' अशी धमकी देत खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद बागवान काकडे, अमर सोनवणे उर्फ पिनू, देवराज सोनवने व एक अनोळखी युवक (सर्व राहणार आमराई बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत कृष्णराज धनाजी जाचक (वय 18, रा.लिमटेक ता.बारामती) या तरुणाने तक्रार दिली आहे.
कृष्णराज हा पाचगणी येथील सिल्वर डेल महाविद्यालयात शिक्षण घेतो. लॉकडाऊन पासून तो घरीच आहे. या दरम्यान त्यांची बारामतीतील एका युवकाशी ओळख झाली होती. याच ओळखीमुळे हर्षद, अमर देवराज यांचीही ओळख झाली. पुढे ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.
'माझे पहिले घर आमराई व दुसरे घर पोलीस स्टेशन'-
गेल्या दोन महिन्यांपूर्वी कृष्णराज हा एमआयडीसीतून पिंपळी रस्त्याने दुचाकीवरून घराकडे जात होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या हर्षद काकडे याने त्याला थांबवत गाडीतील पेट्रोल संपले आहे. शंभर रुपये दे, अशी मागणी केली. कृष्णराज त्याला शंभर रुपये देत असताना त्याने हातातील दोन हजार रुपये हिसकावून घेतले. मी मागेल तेव्हा पैसे द्यायचे, असे म्हणत गळ्यातील साखळी काढून घेतली. 'माझे पहिले घर आमराई व दुसरे घर पोलीस स्टेशन आहे' तुला केस करायची असेल तर कर. मी कोणाला घाबरत नाही. अशी धमकी त्याने दिली, असे कृष्णराज यांनी तक्रारीत म्हटले आहे.
खून करण्याची धमकी देत खंडणीची मागणी-
दोन दिवसांनी देवराज सोनवणे याने त्याच्या मोबाईलवरून कृष्णराजला व्हाट्सअॅप नंबर वरून मेसेज केले. बारामतीतील पोरं तुझ्यावर वार टाकणार आहेत. बारामतीमध्ये दिसू नकोस. तुझ्यावर 307 किंवा 302 शंभर टक्के आहे. तु कोणाकडेही जा, कोणाच्या जीवावर उड्या मारतो, असे मेसेज करत खून करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा-फक्त दाढी वाढवून कोणी रवींद्रनाथ टागोर होत नाही; मंत्री यशोमती ठाकुरांची पंतप्रधानांवर बोचरी टीका
हेही वाचा-शेतकऱ्यांना खुनी ठरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा प्रवास ऱ्हासाच्या दिशेने - शिवसेना