पुणे :राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा.या मागणीसाठी पुण्यातील अलका चौक येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून जोरदार घोषणा देण्यात येत आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असलेले हे आंदोलन अजूनही सुरच आहे. मध्यरात्री दोन वाजल्याच्या सुमारास म्हाडा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत उद्या तुमच्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले आहे.
मुलांच्या मागण्या जाणून घेऊ :या आंदोलनात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सकाळी 10 वाजल्यापासूनच सामील झाले असून ते देखील अजूनही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात सहभागी झाले आहे. मध्यरात्री म्हाडा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आज स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. याची मला कल्पना नव्हती. मी जात असताना मला विद्यार्थी दिसले म्हणून मी आलो आहे. या मुलांच्या काय मागण्या आहेत. ते समजावून घेण्याचा मी प्रयत्न केला असून उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत मी स्वतः हा चर्चा करणार असल्याचे यावेळी निंबाळकर यांनी सांगितले.
अभ्यासक्रमात बदल :विद्यार्थी मागील अनेक वर्षांपासून राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत आहोत. पण अचानक आयोगाकडून आदेश काढला जातो की 2023 पासून तुमच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहेत. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आयोगाने 2025 मध्ये तो नियम लागू करावा अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे. राज्य सरकार अनेक निवडणुका पुढे घेत जात आहे. त्यामुळे आमचा अभ्यासक्रमाचा निर्णय 2025 पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारला सहज शक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा. अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांच्यावतीने करण्यात येत आहे.